Omicron Variant : ओमायक्रॉनचे थैमान! 'या' राज्याने वाढवलं टेन्शन; ICU आणि ऑक्सिजन बेडच्या मागणीत मोठी वाढ By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 08:04 PM 2022-01-20T20:04:35+5:30 2022-01-20T20:31:03+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असून गेल्या 24 तासांत ऑक्सिजन बेड्स आणि आयसीयू बेड्सची मागणी अचानक वाढल्याने तो चिंतेचा विषय ठरला आहे. जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 32 कोटींचा टप्पा पार केला असून 55 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भारतातही गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,17,532 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 491 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांचा आकडा 9,287 वर पोहोचला आहे. याच दरम्यान ओमायक्रॉनने आणखी टेन्शन वाढवलं आहे. केरळमध्ये ओमायक्रॉनचा कहर पाहायला मिळत आहे.
ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असून गेल्या 24 तासांत ऑक्सिजन बेड्स आणि आयसीयू बेड्सची मागणी अचानक वाढल्याने तो चिंतेचा विषय ठरला आहे. राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येनेही रेकॉर्ड मोडला आहे.
गेल्या 24 तासांत ऑक्सिजन बेड्सची मागणी 20 टक्क्यांनी वाढली आहे तर आयसीयू बेड्सची मागणी 15 टक्क्यांनी वाढली आहे. रुग्णालयात नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये वयोवृद्ध रुग्णांची प्रमाण जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
केरळ सरकार सतर्क झालं असून आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी नागरिकांना तातडीचं आवाहन केलं आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉन हे दोन्ही व्हेरिएंट राज्यात सक्रिय आहेत. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेतील स्थिती वेगळी आहे. आता संसर्ग अधिक वेगाने पसरत आहे. त्यामुळे अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. आपण 'सुपर स्प्रेडर' बनणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. पुढचे तीन आठवडे राज्यासाठी क्रिटिकल आहेत, असं म्हटलं आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या या लोकांना लाटेत अधिक धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. तिरुवअनंतपुरम मेडिकल कॉलेजमधील सहप्राध्यापक अनीश टी. एस. यांनी या अनुषंगाने सावधगिरीचा इशारा दिला आहे.
सौम्य लक्षणेही गंभीर समस्येचे कारण ठरू शकतात, असं अनीश यांनी म्हटलं आहे. केरळमध्ये रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांत कोविड-19 च्या ताज्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पॉझिटिव्ही दर देखील 30% पेक्षा कमी झाला आहे. मात्र कोरोना मृतांचा आकडा अजूनही उच्च स्तरावर असून तो चिंताजनक आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली सरकार मृत रुग्णांकडून गोळा केलेल्या नमुन्यांची जीनोम सिक्वेंसिंग घेत आहे. त्यांना ओमायक्रॉन किंवा डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे की नाही हे शोधण्यासाठी ही चाचणी केली जात आहे.
दिल्लीत बुधवारी 35 मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या 353 वर पोहोचली आहे. गेल्या 10 दिवसांत कोरोनाची लागण होऊन 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात नोंदलेल्या मृत्यूची संख्या दुप्पट आहे.
दिल्ली सरकारच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांमध्ये वाढ आणि मृत्यूदर यामध्ये तफावत आहे. त्यामुळे मृत व्यक्तींना ओमायक्रॉन की डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाला होता की नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बायलरी सायन्सेस आणि लोक नायक हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेत कोविड-19 नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग केली जात आहे. ओमायक्रॉनचं माइल्ड नेचर असूनही तो अत्यंत वेगाने पसरत आहे असं म्हटलं आहे.