मोतीलाल नेहरू ते प्रियंका गांधी... एकाच घराण्यातील 11 जण राजकारणात By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 03:22 PM 2019-01-24T15:22:42+5:30 2019-01-24T15:39:27+5:30
प्रियंका गांधी-वाड्रा यांनी अखेर सक्रिय राजकारणात एन्ट्री केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रियंका गांधी यांना सरचिटणीसपद देऊन त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपवली आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदार संघ येतो. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी यांनी बहिणीला राजकारणात प्रवेश देऊन मोठी खेळी खेळल्याचे यानिमित्तानं मानले जात आहे. आतापर्यंत प्रियंका गांधी केवळ राहुल गांधी आणि सोनिया गांधींसोबत जाहीर सभांमध्येच दिसल्या होत्या. राजकारणात त्यांचा सक्रिय असा सहभाग नव्हता. दरम्यान, राजकारणातील ताज्या घडामोडींनुसार, नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत.
1. मोतीलाल नेहरू - देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू काँग्रेससोबत जोडले गेले होते. मोतीलाल नेहरू यांनी दोन वेळा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले आहे. 1919 ते 1920 आणि 1928 ते 1929 या कालावधीदरम्यान मोतीलाल नेहरू काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.
2. पंडित जवाहरलाल नेहरू - वडील मोतीलाल नेहरू यांच्या पावलावर पाऊल टाकत पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही 1912 साली राजकारणात प्रवेश केला. केम्ब्रिज युनिर्व्हसिटीतील आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर जवाहरलाल नेहरू राजकारणात सक्रीय सहभागी झाले होते. 1923 साली जवाहरलाल नेहरू यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. ब्रिटिशांविरोधात लढणारे जवाहरलाल नेहरू एक अग्रगण्य स्वातंत्र्य सेनानी म्हणून ओळखले जायचे. 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला. पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वातंत्र्य देशाचे पहिले पंतप्रधान बनले.
3. इंदिरा गांधी - पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांची एकुलती एक कन्या इंदिरा गांधी यांनीही राजकारणात प्रवेश केला. 1958 साली, काँग्रेसच्या केंद्रीय संसदीय मंडळाची सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली. 1966 साली इंदिरा गांधी या देशाच्या तिसऱ्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. 1975 साली इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली. या निर्णयाचा फटका त्यांना 1977 साली निवडणुकांमध्ये सहन करावा लागला होता. दरम्यान, 31 ऑक्टोबर 1984 साली इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली.
4. फिरोज गांधी - फिरोज गांधी हे इंदिरा गांधी यांचे पती. फिरोज गांधी हे स्वतः राजकारणात सक्रिय होते. भारत छोडो आंदोलनातही त्यांचा सहभाग होता.
5. राजीव गांधी - 1984 साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांचे मोठे पुत्र राजीव गांधी प्रचंड बहुमतानं देशाचे पंतप्रधान बनले. राजीव गांधींनी पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा ते देशाचे सर्वांत तरुण पंतप्रधान ठरले होते. 1985 ते 1991 पर्यंत ते काँग्रेसच्या अध्यक्षपदावरही कायम होते. 1991च्या लोकसभा निवडणुकीतील एका प्रचारसभेच्या वेळी त्यांची लिट्टेकडून हत्या करण्यात आली.
6. संजय गांधी - संजय गांधी हे इंदिरा गांधी यांचे छोटे पुत्र. संजय गांधीदेखील राजकारणात सक्रिय होते. मात्र 1980 साली हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
7. सोनिया गांधी - राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी यांनी 1998 साली काँग्रेसची कमान सांभाळली आणि पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.
8. मनेका गांधी - संजय गांधी यांच्या पत्नी मनेक गांधी लोकसभेच्या खासदार आहेत. मोदी सरकारमध्ये त्या केंद्रीय महिला व बालविकास मंत्रिपद सांभाळत आहेत.
9. राहुल गांधी - डिसेंबर 2017मध्ये राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 2004पासून ते देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत.
10. वरुण गांधी - संजय गांधी आणि मनेका गांधी यांचे पुत्र वरुण गांधी उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे खासदार आहेत.
11. प्रियकां गांधी - 23 जानेवारी 2019 - प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.