Modi Security Breach : 'त्या' 20 मिनिटांत नेमकं काय-काय घडलं...? PM मोदी फ्लायओव्हरवर अडकल्याची संपूर्ण स्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 12:51 PM 2022-01-06T12:51:53+5:30 2022-01-06T13:00:48+5:30
खराब हवामानामुळे पंतप्रधान मोदी भटिंडाहून फिरोजपूरकडे कारने रवाना होतात. मात्र मधेच आंदोलकांमुळे त्यांचा ताफा 20 मिनिटे उड्डाणपुलावरच अडकून होता. यानंतर... तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पहिल्यांदाच पंजाबच्या दौऱ्यावर होते. मात्र हा दौरा पूर्ण होऊ शकला नाही. पंजाबमधील फिरोजपूरमधील रॅली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींमुळे रद्द करण्यात आली.
खराब हवामानामुळे पंतप्रधान मोदी भटिंडाहून फिरोजपूरकडे कारने रवाना होतात. मात्र मधेच आंदोलकांमुळे त्यांचा ताफा 20 मिनिटे उड्डाणपुलावरच अडकून होता. यानंतर आता मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींवरून राजकारण तापले आहे. जाणून घेऊयात, मोदींच्या भटिंटा पोहोचण्यापासून ते 20 मिनिटे फ्लाय ओव्हरवर अडकण्यापर्यंतची संपूर्ण स्टोरी...
पंतप्रधान मोदी बुधवारी सकाळी भटिंडा येथे पोहोचले. त्यांना येथून हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जायचे होते. मात्र, पाऊस आणि खराब हवामानामुळे, पंतप्रधानांनी त्यात सुधार होण्याची वाट पाहिली. पण हवामानात सुधारणा होत नसल्याने त्यांनी कारने नैशनल मेरीटर्स मेमोरियलचा दौरा करण्याचे ठरवले. यासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागणार होता.
30 किलोमीटर आधिच थांबला ताफा - पीएम मोदींना कारने जाण्यासाठी 2 तास लागणार होते. त्यांचा ताफा निघाला आणि हुसैनीवाला येथे शहीद स्मारकाच्या 30 किलोमीटर आधीच एका फ्लायओव्हरवर पोहोचला. येथे निदर्शकांनी रोड ब्लॉक करून ठेवला होता. दुपारी 2 वाजताच्या सुमारास पीएम मोदींचा ताफा फ्लायओव्हरवर सुमारे 20 मिनिटांपर्यंत अडकून होता. ही पंतप्रधानांच्या सुरक्षिततेत झालेली मोठी चूक होती.
सोशल मीडयावर व्हिडिओ व्हायरल - आंदोलकांमुळे पंतप्रधानांचा ताफा थांबताच एसपीजीचे जवान पंतप्रधानांच्या गाडीला घेरून उभे राहिले. या 20 मिनिटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप नेते व्हिडिओ पोस्ट करत आहेत, यात काही लोक पंतप्रधानांच्या ताफ्याच्या अगदी जवळ येताना दिसत आहेत.
याचवेळी, काँग्रेसने ट्विट केलेल्या व्हिडिओंमध्ये पंतप्रधानांच्या ताफ्याजवळ उपस्थित असलेले लोक हातात भाजपचा झेंडा फडकावताना दिसत आहेत. यावेळी ते मोदी जिंदाबादच्या घोषणाही देत आहेत.
3 वाजता पंतप्रधानांचा ताफा भटिंडाकडे परतला - दुपारी 2.30 वाजता पंतप्रधानांची फिरोजपूरमधील रॅली रद्द झाल्याची बातमी आली. केंद्रीय गृह मंत्रालयाने या घटनेला पंतप्रधानांच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटी असल्याचे म्हटले आहे. यानंतर, ताफ्याने परतण्याचा निर्णय घेतला.
3 वाजताच्या सुमारास पीएम मोदी भटिंडा विमानतळावर परतले. येथे आल्यानंतर ते तेथील अधिकाऱ्यांना सांगतात, की आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, की मी भटिंडा विमानतळावर जीवंत परतू शकलो.
सुरक्षेतील त्रृटीनंतर उपस्थित झाले अनेक प्रश्न - 1. पंतप्रधान मोदी रस्त्याने जातात, मग रस्ता ब्लॉक कसा झाला? 2. निदर्शकांना तेथून वेळीच का हटवले गेले नाही?
3. पीएम मोदींच्या मार्गासंदर्भात एसपीजीपर्यंत योग्य माहिती पोहोचली होती का? 4. पंतप्रधान कुठे गेले, तर पर्यायी मार्ग तयार असतो. अशी व्यवस्था इथे होती का?