सावरकरांवरील टीकेला प्रत्युत्तर, अमित शहांनी करुन दिली आजीची आठवण By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 12:13 PM 2023-03-30T12:13:42+5:30 2023-03-30T13:04:57+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाने राज्यातील महाविकास आघाडीत पुन्हा पेच उभा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावरुन, भाजप नेतेही आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाने राज्यातील महाविकास आघाडीत पुन्हा पेच उभा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावरुन, भाजप नेतेही आक्रमक झाले आहेत.
सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे उद्धव ठाकरे यांनी थेट राहुल गांधींवर टीका केली आणि इशाराही दिला. दुसरीकडे भाजप-शिवसेनेने हा मुद्दा उचलून धरत ठाकरेंची चांगलीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत राहुल गांधींनी केलेल्या विधानाबद्दलची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. त्यामुळे, काँग्रेसला अखेर सावरकरांच्या मुद्द्यावरुन बॅकफूटला जावे लागलंय.
मै राहुल गांधी हूँ, सावरकर नही, गांधी कभी माफी नही माँगते, असे म्हणत राहुल गांधींनी लोकसभा सदस्यत्त्व रद्द केल्याच्या पत्रकार परिषदेत वेगळ्याच मुद्द्याला हात घातला.
राहुल गांधींच्या या पत्रकार परिषदेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. भाजप आणि शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्रेची घोषणाच करण्यात आली. तर, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंही आपली भूमिका स्पष्ट केली.
याप्रकरणी आता, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींना सल्लाच दिलाय. सावरकरांबद्दल असे शब्दप्रयोग करणं योग्य नाही. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्यांपैकी वीर सावरकर एक आहेत, असे शहा यांनी म्हटले.
एकाच वर्षात दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेले एकमेव स्वातंत्र्यावीर सावरकर आहेत. राहुल गांधींनी त्यांच्या आजीकडून, इंदिराजींच्याकडूनही याची प्रेरणा घ्यावी, असेही अमित शहांनी राहुल गांधींना सुनावले.
राहुल गांधींनी माफी नाही मागायची तर मागू नये. पण, वीर सावरकरांबद्दल असं बोलणं योग्य नाही. माफी मागायची नाही तर मग कोर्टाकडून जामीनही करुन घेऊ नये. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन केलाय, त्यांनी.
महात्मा गांधींचं उदाहरण देत, इंग्रजांनी महात्मा गांधींना शिक्षा केली होती. तेव्हा महात्मा गांधींनी माफी मागितली नव्हती, दंडही भरला नव्हता. गांधीजींनी तसं केलं होतं, मग राहुल गांधींनीही तसं करावं, असेही शहांनी म्हटलं.
राहुल गांधींनी इंदिराजींचे भाषण पाहावेत, मग त्यांना सावरकरांबद्दल माहिती होईल, असा टोलाही अमित शहांनी राहुल गांधींना लगावला