Russia Ukraine War: अमेरिकेची भारताला सर्वात मोठी ऑफर; नरेंद्र मोदी रशियाची साथ सोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 06:52 PM2022-03-23T18:52:01+5:302022-03-23T19:00:46+5:30

रशिया-यूक्रेन युद्धामुळे(Russia Ukraine War) जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत आहे. रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह नाटो देशांनी रशियावर निर्बंध लादले. मात्र भारताला पाश्चात्य देशांनी वारंवार आवाहन करूनही या हल्ल्यात भारताने(India) तटस्थ भूमिका घेतली आहे.

भारताच्या या भूमिकेमागे रशियाचा मोठा हात आहे. कारण भारत मोठ्या प्रमाणात संरक्षण हत्याराबाबत आजही रशियावर निर्भर आहे. अमेरिका भारताची ही मजबुरी जाणते. त्यामुळे आता अमेरिकेने भारताला मोठी ऑफर दिली आहे.

अमेरिकेने रशियाच्या शस्त्रांवर टीका करत म्हटलंय की, अमेरिका भारताला संरक्षण क्षेत्रात मदत करण्यास उत्सुक आहे. रशियातील जवळपास ६० टक्के मिसाइल काम करण्याच्या स्थितीत नाहीत त्यामुळे भारताचं रशियावर निर्भर राहणं योग्य आहे का हा विचार करण्याची भारताला गरज आहे.

यूक्रेनसोबतच्या युद्धात रशियाची हत्यारं कशारितीने अयशस्वी ठरत आहेत ते भारताने पाहावं असं अमेरिकेने सांगितले आहे. अमेरिका भारताला शस्त्रसाठा देईल. अमेरिकेचे(America) परराष्ट्र सचिव विक्टोरिया नुलँड यांनी बुधवारी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे

रशिया-यूक्रेन युद्धाबाबत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्याशी चर्चा सुरू आहे. अमेरिका भारताला संरक्षण क्षेत्रातील पुरवठ्याबाबत रशियावरील निर्भरता कमी करण्यासाठी मदत करू शकेल. त्याचसोबत अमेरिकेने रशिया-चीन यांच्यातील जवळीक संबंध यावरूनही भारताला सतर्क केले आहे.

अमेरिकेने म्हटलं आहे की, यूक्रेन युद्धावेळी रशियानं चीनकडे मदत मागितली आहे. ते चीनचा पैसा आणि हत्यारं मागत आहेत. त्यामुळे रशिया आणि चीन यांच्यातील संबंध वाढणं हे केवळ अमेरिकेसह नाही तर भारतालाही धोकादायक आहे.

रशिया केमिकल आणि जैविक हत्यारांच्या वापराबाबत बेजबाबदारपणे भाष्य करत आहे. अशावेळी भारत आणि अमेरिकेसारख्या लोकशाही देशांनी एकत्र उभं राहणं गरजेचे आहे. भारत-रशिया यांच्यात ऐतिहासिक संबंध आहेत परंतु यूक्रेन मुद्द्यावर आम्ही एकत्र उभं राहू असं अमेरिकेने सांगितले आहे.

त्याचसोबतच आम्ही भारतासोबत या विषयावरही बोललो आहे. की खरेच रशिया भारताला विश्वासर्ह संरक्षण हत्यारांचा पुरवठा करत आहे का? यूक्रेनसोबतच्या युद्धात रशियाच्या हत्यारांचा प्रदर्शन पाहता अशा देशांकडून हत्यार खरेदी करावी असं वाटतं का? युद्धामुळे रशियाला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे.

त्यामुळे दुसऱ्यांना देण्या इतपत हत्यारे आहेत का? जर रशियाशी युद्धासोबत आम्ही यूक्रेनला शस्त्र पुरवठा करू शकत असू मग भारताला देणार नाही का? पुतिनसारख्या माणसावर निर्भर राहण्याची खरच गरज आहे का? अशावेळी पर्याय म्हणून नक्कीच अमेरिका भारतासोबत राहण्यास उत्सुक आहे. या प्रक्रियेला खूप वेळ लागेल. परंतु आम्ही प्रयत्न करत राहू. आम्हाला भारतासोबत मिळून पुढे जायचं आहे असं अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

तसेच यूक्रेन मुद्द्यावर भारताने माणुसकीच्या दृष्टीकोनातून पाहावे. हे युद्ध थांबवण्यासाठी भारताने आवाहन केले. भारताने युक्रेनला अत्यावश्यक साहित्य पाठवले. परंतु रशियाविरोधात मतदानात भाग घेतला नाही. आमच्या सर्व मित्रांनी रशियाच्या हल्ल्याचा विरोध करावा असं आम्हाला वाटतं हे अमेरिकेने सांगितले आहे.