रशियाच्या धमकीला हलक्यात घेता येणार नाही; पुतीन नाराज झाले तर भारताला बसेल फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 12:09 PM2023-05-25T12:09:05+5:302023-05-25T12:11:57+5:30

जगात जर कोणत्या २ देशांच्या मैत्रीचं उदाहरण द्यायचे झाले तर सर्वात आधी भारत आणि रशियाचे नाव येते. मागील वर्षी युक्रेनसोबत युद्धाला सुरुवात झाल्यापासून जगातील बहुतांश देशाने रशियाचा विरोध केला परंतु भारताने त्याही परिस्थितीत रशियासोबतच्या संबंधांवर परिणाम होऊ दिला नाही.

पण आता रशिया-भारत यांच्या मैत्रीत फूट पडण्याची शक्यता आहे. पाश्चात्य देशांनी FATF(फायनॅन्शल एक्शन टास्क फोर्स) यादीत ब्लॅक लिस्ट रशियाचा समावेश करून आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे रशियाने भारतासह त्यांच्या मित्रदेशांकडे धमकीवजा मदत मागितली आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, रशियाने भारतासह इतर देशांना संरक्षण आणि ऊर्जा करार रद्द करण्याची धमकी दिली आहे, जर त्यांनी FATF च्या ब्लॅकलिस्टपासून रशियाला दूर करण्यास मदत केली नाही तर त्याचा परिणाम होईल असं रशियाने म्हटलं आहे.

FATF (फायनान्शियल एक्शन टास्क फोर्स) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी आंतरराष्ट्रीय आर्थिक गुन्हे रोखण्याचा प्रयत्न करते. FATF च्या काळ्या किंवा ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या देशावर देखरेख वाढवली जाते आणि त्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत बंद केली जाते.

FATF ने फेब्रुवारीमध्ये रशियाचं सदस्यत्वातून निलंबित केले. दुसरीकडे युक्रेन रशियावर आणखी निर्बंध घालण्यासाठी दबाव टाकत आहे. सध्या या रिपोर्टवर भारत आणि रशियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र रशियाची धमकी भारतासाठी धोक्याची ठरू शकते. दोन्ही देशांमधील संबंध बिघडले तर अनेक प्रकल्पांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

रशिया FATF मध्ये सामील झाल्यास तेल कंपनी रोसनेफ्ट आणि नायरा एनर्जी लिमिटेड यांच्यातील सहकार्यावर परिणाम होईल. भारताला रशियन शस्त्रास्त्रे आणि लष्करी उपकरणांची निर्यात तसेच संरक्षण क्षेत्रातील तांत्रिक सहकार्यावरही परिणाम होऊ शकतो.

रशियाची धमकी नवीन संयुक्त उड्डयन प्रकल्पासाठीचा रशियन प्रस्ताव फेब्रुवारीमध्ये एरो इंडिया 2023 प्रदर्शनात सादर करण्यात आला. RZD भारतातील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील तंत्रज्ञान आणि ऊर्जा सहकार्यावर रशियन रेल्वेचे लॉजिस्टिक आणि उत्तर-दक्षिण व्यापार कॉरिडॉरच्या विकासाशी निगडीत माल वाहतूक सेवा आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील कराराला धोका निर्माण झाला आहे.

अमेरिका आणि त्याच्या मित्रपक्षांकडून युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशिया सर्वाधिक निर्बंध असलेला देश बनला आहे. निर्बंधाच्या माध्यमातून पाश्चात्य देश रशियावर यूक्रेन युद्धातून मागे हटण्यासाठी दबाव बनवत असल्याचे बोलले जाते.

परंतु रशियाने भारतासह चीनसारख्या देशांसोबत संबंध मजबूत करून देशाची अर्थव्यवस्थेला फटका बसण्यापासून रोखले आहे. त्यात रशियाचा FATF च्या ब्लॅक लिस्ट किंवा ग्रे लिस्ट यादीत समावेश झाला. तर भारतासाठी रशियासोबत व्यापार करणे आणि याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

एफएटीएफने सांगितले की, यूक्रेनसोबत रशियाचे जे युद्ध सुरू आहे ते FATF च्या मूलभूत सिद्धांताविरोधात आहे. रशियाची कारवाई यूक्रेनला उकसवण्याची आहे. त्यामुळे सदस्यता रद्द केल्यानंतर आता FATF रशियाला ब्लॅक अथवा ग्रे यादीत समावेश करण्याची शक्यता आहे.