शाळा-कॉलेज बंद, लोक घरात कैद, मास्क लावण्याचे आदेश! गॅस चेंबर बनलेल्या कोचीत लॉकडाऊनसारखी स्थिती? By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 11:44 AM 2023-03-10T11:44:01+5:30 2023-03-10T12:01:41+5:30
येथे लोकांवर घरातच कैद होण्याची आणि मास्क लावण्याची वेळ आली आहे. येथे रस्त्यावरही फार कमी लोक दिसत आहेत आणि जे लोक दिसत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर मास्क आहे... केरळमधील कोची शहरात सध्या शांतता पसरली आहे. लोकांवर घरातच कैद होण्याची आणि मास्क लावण्याची वेळ आली आहे. येथे रस्त्यावरही फार कमी लोक दिसत आहेत आणि जे लोक दिसत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर मास्क आहे. मात्र ही समस्या कोरोना व्हायरसमुळे नाही, तर येथील एका डम्पिंग यार्डला लागलेल्या आगीतून निघणाऱ्या धुरामुळे उद्भवली आहे.
ब्रह्मपुरम परिसरातील महापालिकेच्या एका डंपिंग यार्डमध्ये गेल्या आठवड्यात 2 मार्चला आग लागली होती. लागलेल्या या आगीमुळे कोची शहरात सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून शहराती लोकांचा दम कोंडत आहे. हे धुराचे लोट अगदी जवळच्याच एर्नाकुलम जिल्ह्यातील कडवंतरा, मराडू, व्याटिला आणि पानमपल्ली नगर आदी भागांतही पसरला आहे.
ब्रह्मपुरम आणि आसपासच्या परिसरातील हवेची गुणवत्ताही वेगाने खराब होत चालली आहे. हे लक्षात घेत केरळ सरकारने या भागातील लोकांना घरातच राहण्याचे आणि दारं-खिडक्या बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना लॉकडाऊनसारखी अॅडव्हायजरी जारी - केरळ सरकारने स्थानिक नागरिकांना जॉगिंग आणि व्यायामासाठी घराबाहेर जाणे टाळण्याचा आणि बाहेर पडल्यास N95 मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय, एर्नाकुलम जिल्हा प्रशासनाने आरोग्यासंदर्भातील खबरदारी म्हणून शाळा आणि कॉलेजसह शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही, तर काही ठिकाणच्या ग्रामपंचायती आणि नगरपालिकांतही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
याच बरोबर, एर्नाकुलम जिल्हा प्रशासनाने कलामस्सेरी वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा वैद्यकीय अधिकारी (डीएमओ) यांच्या कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्षही स्थापन केले आहेत, जेणेकरून प्लांटमधून निघणार्या धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्यास लोकांना कॉल करता येईल.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा परिस्थितीत लोक मेडिकल कॉलेज कंट्रोल रूमला 8075774769 अथवा डीएमओ कंट्रोल रूमला 0484 2360802 या क्रमांकांवर कॉल करू शकतात.
200 फायर बिग्रेडच्या गाड्यांचा वापर - केरळ अग्निशमन आणि बचाव दल ब्रह्मपुरममध्ये सुमारे 200 अग्निशामकांसह परिस्थिती हाताळत आहे. कन्नूर ते तिरुअनंतपुरमपर्यंत अग्निशमन दलाचे जवान २४ तास कार्यरत आहेत. अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागात प्लास्टिक कचऱ्याला आग लागली त्यातील 70 टक्के भाग विझवण्यात आला असून उर्वरित 30 टक्के भागात आग विझवण्याचे काम सुरू आहे.
आग विझविण्यासाठी लावण्यात आली आहेत हवाई दलाची विमानं - ब्रह्मपुरम कचरा प्रक्रिया प्रकल्पात लागलेली आग विझवण्यासाठी भारतीय हवाई दलाने एक Mi 17 V5 हेलिकॉप्टर लावले आहे. भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित भागात सहा शटल उडविण्यात आले. तसेच, जवळच्याच जलाशयातून 10,800 लिटर पाणी शिंपडण्यात आले आहे. हे हेलिकॉप्टर एअरफोर्स स्टेशन सुलुरचे होते.