खळबळजनक दावा! आणीबाणीत इंदिरांना संघाची मोठी मदत, त्यामुळेच पुन्हा सत्तेत परतल्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 11:17 AM 2023-08-02T11:17:54+5:30 2023-08-02T11:23:18+5:30
ते शरद पवारांनाही जमले नाही... ज्येष्ठ पत्रकाराच्या पुस्तकातून मोठमोठे दावे... लोकसभेपूर्वी राजकारण ढवळून निघण्याची चिन्हे... माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि आरएसएसमधील राजकीय संबंधांवर एका पुस्तकात खळबळजनक दावा करण्यात आला आहे. आणीबाणीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इंदिरा गांधींना फक्त मदतच केली नव्हती तर १९८० मध्ये सत्तेत परत येण्यासही मदत केली होती. परंतू, तरीही इंदिरा गांधी संघापासून सुरक्षित अंतर ठेवून असायच्या असा दावा ज्येष्ठ पत्रकारांनी लिहिलेल्या पुस्तकात करण्यात आला आरहे.
स्वातंत्र्यानंतरच्या पुढील सहा दशकांत देशाने जेवढे जेवढे पंतप्रधान पाहिले, त्यांच्या कार्यशैलीवर पत्रकार नीरजा चौधरी यांनी पुस्तक लिहिले आहे. 'हाउ प्राइम मिनिस्टर्स डिसाइड' मध्ये हे दावे करण्यात आले आहेत.
आरएसएस विरोधात असूनही इंदिरा यांनी आणीबाणीवेळी संघाचे समर्थन मिळविले होते. आणीबाणीच्या काळात संधाचे तिसरे प्रमुख बाळासाहेब देवरस यांनी इंदिरा यांना अनेकदा पत्रे लिहिली होती. संघाचे अनेक नेते तेव्हा कपिल मोहन यांच्यामार्गे संजय गांधींशी संपर्क करायचे.
मुस्लिम काँग्रेसवर नाराज असू शकतात, या कारणामुळे त्या त्यांच्या राजकारणाचे हिंदूकरण करणार होत्या. या कामात त्यांना आरएसएसचे थोडेच समर्थन नाही तर तटस्थ राहणे देखील इंदिरा गांधी यांना फायद्याचे ठरणारे होते. 1980 मध्ये अटलबिहारी वाजपेयी आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा उभारण्यात व्यस्त असताना इंदिरा गांधी काँग्रेसचे हिंदूकरण करत होत्या, असा दावा नीरजा यांनी केला आहे.
इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय राहिलेले अनिल बाली यांचा हवाला या पुस्तकात देण्यात आला आहे. संघाने त्यांना 1980 मध्ये 353 जागांवर प्रचंड विजय मिळवून सत्तेवर परतण्यास मदत केली होती. एवढ्या जागा त्या एकट्याच्या जिवावर जिंकू शकत नव्हत्या, असे बाली यांनी म्हटले आहे.
हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. इंदिरा गांधींचे मंदिरांना भेटी देण्याचे प्रमाण वाढले होते. यामुळे संघाचे नेते प्रभावित झाले होते. खुद्द देवरस यांनी एका कार्यक्रमात इंदिरा या एक मोठ्या हिंदू आहेत, असे म्हटले होते. बाली यांच्या म्हणण्यानुसार, देवरस आणि इतर संघ नेते इंदिरांमध्ये हिंदूंचा नेता पाहत असत.
काँग्रेस सोडलेल्या एकाच नेत्याला जमले... काँग्रेस सोडणाऱ्या कोणत्याही नेत्याला व्हीपी सिंग यांच्यासारखा राष्ट्रीय राजकारणात प्रभाव पाडता आला नाही. मग ते चंद्रशेखर असोत किंवा शरद पवार, रामकृष्ण हेगडे, ममता बॅनर्जी किंवा जगन मोहन रेड्डी, असे या पुस्तकात म्हटले आहे. व्हीपी सिंग यांनी एका वर्षापेक्षा कमी काळ असतानाही काँग्रेसेतर सरकार स्थापन करण्यासाठी उजव्या, डाव्या, केंद्रीय आणि प्रादेशिक शक्तींना एकत्र आणले. ही पहिली खरी राष्ट्रीय-युती होती.
प्रादेशिक पक्षांना प्रथमच राष्ट्रीय राजकारणात सहभाग मिळाला. बाकीचे जे नेते पक्ष सोडून गेले ते फक्त राज्यांपुरतेच मर्यादित होते, पण अनेक वेळा त्यांना सरकार स्थापनेसाठी काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज भासली, असा दावा करण्यात आला आहे.
संघाकडून इंदिरांची पुन्हा पुन्हा स्तुती... १९७१ मध्ए पाकिस्तानचे दोन तुकडे करणे आणि बांग्लादेशच्या निर्मितीमुळे संघ इंदिरांवर खूपच प्रभावित झाला होता. तत्कालीन संघप्रमुख माधव सदाशिव गोळवलकर यांनी या कामगिरीचे श्रेय तुम्हाला जाते, असे म्हटले होते.
यानंतर अणुचाचण्यांच्या तीन वर्षांनी संघाने पुन्हा इंदिरा गांधींचे गोडवे गायले. संघाला नेहमीच लष्करीदृष्ट्या ताकदवर भारत हवा होता.