Sidhi Bus Accident : बस बुडत असताना या मुलीने प्रसंगावधान दाखवले, भावासोबत मिळून अनेकांचे प्राण वाचवले By बाळकृष्ण परब | Published: February 17, 2021 08:33 AM 2021-02-17T08:33:23+5:30 2021-02-17T08:40:47+5:30
Sidhi Bus Accident Shivrani saved passengers : मध्य प्रदेशमधील सिधी येथे मंगळवारी झालेल्या भीषण अपघातादरम्यान, एका लहान मुलीने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे. मध्य प्रदेशमधील सिधी येथे मंगळवारी झालेल्या मोठ्या अपघातात बस कालव्यात पडून ४७ जणांचा मृत्यू झाला. मात्र या भीषण अपघातादरम्यान, एका लहान मुलीने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे. ही बस कालव्यात बुडत असताना शिवरानी कालव्याच्या बाजूला उभी होती. बस बुडताना दिसताच तिने मागेपुढे न पाहता कालव्यात उडी घेतली.
बस कालव्यात कोसळल्यानंतर शिवरानी नावाच्या मुलीने प्राणाची चिंता न करता कालव्यात उडी टाकून दोघांना सुखरूप बाहेर काढले. बस कालव्यात कोसळली त्यावेळी शिवरानी तिच्या भावासोबत जवळच उभी होती.
मुख्यमंत्री चौहान यांनी शिवरानी हिने दाखवलेल्या शौर्याचे कौतुक केले आहे. तिचा अभिमान असल्याचे ट्विट केले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटमध्ये म्हटले की, शिवरानी हिने दाखवलेल्या साहसाचे मी कौतुक करतो. तिने दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल तिचे मी आभार मानतो. संपूर्ण राज्याला तिने दाखवलेल्या धैर्याचा अभिमान आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशिवाय घटनास्थळावर पोहोचलेल्या भाजपा खासदार रीती पाठक आणि भाजपा आमदार शरतेंदू तिवारी यांनीही तिच्या साहसाचे कौतुक केले आहे.
या घटनेविषयी माहिती देताना शिवरानी हिने सांगितले की, अपघातग्रस्त बस खूप वेगाने जात होती आणि अचानक कालव्यात पडली. त्यानंतर प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. तेव्हा मी धावत आले आणि बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी कालव्यात उडी घेतली. शिवरानी आणि तिच्या भावांनी मिळून ६ जणांचे प्राण वाचवले.
शिवरानी म्हणाली की, या घटनेमध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मला खूप दु:ख झाले आहे. मात्र भावासोबत मिळून काही जणांचे प्राण वाचवता आल्याचे समाधानही आहे.
सिधी जिल्ह्यात झालेल्या अपघातानंतर येथे शोकाकुल वातावरण आहे. आपल्या नातेवाईकांचे मृतदेह पाहून कुटुंबीयांना शोक अनावर होत आहे. या अपघातात आपल्या भावाला गमावणाऱ्या विभा प्रजापती यांनी सांगितले की, ही बस वेगाने जात होती आणि कालव्यात पडल्यावर तिच्यात पाणी भरले. लोकांनी काच फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र काचा फुटल्या नाहीत. मी बाहेर आले. माझ्या भावाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याचा हात कसा सुटला हे कळले नाही.