भारतातील एक अनोखं गाव जिथं प्रत्येक कुटुंबात जन्म होतो जुळ्या मुलांचा; डॉक्टर देखील हैराण! By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 07:48 PM 2021-05-24T19:48:51+5:30 2021-05-24T20:04:24+5:30
जगात अनेक रहस्यमय गोष्टी घडत असतात पण अनेकदा अशा रहस्यांमागचं सत्य कधी ना कधी उघडकीस येत असतं. पण भारतातील एका गावाचं एक वेगळंच रहस्य आहे. ते आपण आज जाणून घेणार आहोत. भारतात एका गावाची एक अशी खासियात आहे की ज्यामागचं रहस्य आजवर उलगडू शकलेलं नाही. गावातील डॉक्टर देखील हैराण झाले आहेत. अशा एका अनोख्या गावाची गोष्ट आपण आज जाणून घेणार आहोत.
इतर गावासारखंच भारतातील हे गाव देखील सर्वसामान्य गाव आहे. पण या गावातील लहान मुलांच्या जन्माची एक अनोखी कहाणी आहे की ज्यानं संपूर्ण जग हैराण झालं आहे.
केरळच्या मलापुरम जिल्ह्यातील कोदिन्ही गावात एकूण २ हजार कुटुंब आहेत. या गावाची खासियत म्हणजे गावात बहुतेक करुन जुळ्या मुलांचा जन्म होतो.
एका रिपोर्टनुसार, या गावात २२० हून अधिक जुळी मुलं आहे. गावातील जुळ्या मुलांच्या जन्माचा दर संपूर्ण देशात जन्म होणाऱ्या जुळ्या मुलांच्या दरापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक आहे.
महत्वाची बाब म्हणजे या गावात भारतातील पहिला जुळ्यांची संघटना देखील तयार करण्यात आली आहे.
गावात सर्वात आधी १९४९ रोजी पहिल्या जुळ्या मुलांचा जन्म झाला होता. त्यानंतर गावात जुळ्यांचा जन्म होण्याचं प्रमाण वाढत गेलं.
एका गावात इतक्या मोठ्या प्रमाणात जुळ्या मुलांचा जन्म कसा होतो यावर अभ्यास करण्यासाठी जर्मनी आणि ब्रिटनहून एक संयुक्त पथक आलं होतं. अभ्यासासाठी त्यांनी गावातील लोकांचे डीएनए देखील तपासले. पण आजवर यामागचं खरं कारण कुणालाच कळू शकलेलं नाही.
गावातील ८५ टक्के लोकसंख्या मुस्लिम बहुल आहे. पण याचा अर्थ असा नाही की हिंदु कुटुंबामध्ये जुळ्यांचा जन्म होत नाही. इथं जवळपास प्रत्येक कुटुंबात जुळ्या मुलांचा जन्म झाला आहे. दर १ हजार मुलांमध्ये ४२ जुळ्या मुलांचं प्रमाण इथं नोंदवलं गेल्याचं सांगितलं जातं.