इंधन दरवाढ मागे घ्या, पेट्रोल दरावाढीविरोधात काँग्रेस आक्रमक By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 01:05 PM 2020-06-29T13:05:20+5:30 2020-06-29T13:19:03+5:30
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार ७ जूनपासून दररोज पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ करत सामान्य जनतेला लुटत आहे. देश गंभीर संकटाचा सामना करत असताना मोदी सरकार अन्यायी इंधन दरवाढ करुन नफेखोरी करत आहे. याविरोधात काँग्रेसने सोमवारी राज्यव्यापी आंदोलन केले.
काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात बार्शीत इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. थोरात हे पुणे येथे आंदोलनात सहभागी होणार झाले होते.
दररोजच्या भाववाढीमुळे पेट्रोल प्रति लिटर ९.१२ रुपये तर डिझेल ११.०१ रुपयांनी वाढले आहे त्यामुळे एक लिटर पेट्रोलला ८७-८८ रुपये मोजावे लागत आहेत. दिल्लीमध्ये तर डिझेल पेट्रोलपेक्षा जास्त महाग आहे.
पेट्रोलची ही भाववाढ अशीच राहिली तर पेट्रोल १०० रुपये लिटर होण्यास जास्त दिवस लागणार नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड कमी असतानाही मोदी सरकार त्याचा लाभ सामान्य जनतेला देत नाही.
कोरोनामुळे लोकांचे रोजगार गेले आहेत, उद्योग-व्यवसाय अजून पूर्वपदावर आलेले नाहीत, त्यात ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. याच पार्श्वभूमीवर आज सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी १० ते १२ या वेळत दोन तास धरणे आंदोलन करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी काँग्रेसने केली.
राष्ट्रपतींच्या नावे एक निवेदन देण्यात आले असून या मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते ४ जुलै या सप्ताहात ब्लॉक व तालुका स्तरावर धरणे आंदोलन करुन केला जाणार असल्याचे थोरात यांनी म्हटले.
डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती १६४ डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढल्या असतानाही त्याचा बोजा सामान्यांवर पडणार नाही याची काळजी घेत इंधनाचे दर स्थिर ठेवले होते.
२०१४ मध्ये पेट्रोलवर उत्पादन शुल्क हे ९.४० रुपये तर डिझेलवर ३.५६ रुपये होते.
केंद्रातील भाजप सरकारने हेच शुल्क पेट्रोल ३२.९८ रुपये तर डिझेल ३१.८३ रुपये पर्यंत वाढवले आहेत. त्यामुळे इंधन दरवाढ करुन सुरु असलेली नफेखोरी बंद करावी, व भाववाढ तात्काळ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे थोरात म्हणाले.
सोशल डिस्टन्स ठेवून तसेच मास्क लावूनच आंदोलन करण्यात आले. तर, #SpeakuponPetroleumPrices ही ऑनलाईन मोहिमही सोशल मीडियावर चालवण्यात आली. या मोहिमेतूनही काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला.