१९९० नंतर भाजपाची ऐतिहासिक कामगिरी; पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे पहिल्यांदाच ‘असं’ घडलं By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 08:57 PM 2022-04-01T20:57:30+5:30 2022-04-01T21:02:33+5:30
भारतीय जनता पक्ष (BJP) सातत्याने नवनवीन विक्रम करत आहे. पक्षाच्या इतिहासात प्रथमच राज्यसभेतील सदस्यांचा आकडा १०० च्या पुढे गेला आहे. त्याचबरोबर १९९० नंतर ही ऐतिहासिक कामगिरी करणारा हा पहिलाच पक्ष ठरला आहे.
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या गुरुवारी झालेल्या फेरीनंतर भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांची संख्या आता १०१ वर गेली आहे. निवडणुकीत आसाम, त्रिपुरा आणि नागालँडच्या जागा जिंकून त्यांनी आपल्या सदस्यांची संख्या १०० ओलांडली आहे.
१३ पैकी चार जागा जिंकून भाजपाने ही कामगिरी केली. यासाठी गुरुवारी मतदान झाले. भाजपचा सहकारी पक्ष युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (UPPL) ने आसाममधून राज्यसभेची एक जागा जिंकली. आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांमधून भाजपाने राज्यसभेच्या चार जागा जिंकल्या. या भाजपाने वरिष्ठ सभागृहातील सदस्यांची संख्याही वाढवली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले की, आसामने एनडीएच्या दोन उमेदवारांना राज्यसभेवर निवडून पंतप्रधानांवर विश्वास दाखवला आहे. भाजपाच्या पबित्रा मार्गेरिटा ११ मतांनी विजयी झाल्या आणि यूपीपीएलच्या रावंगावरा नरझारी नऊ मतांनी विजयी झाल्या.
राज्यसभेत भाजपाने १०० चा आकडा पार केल्याने, या वर्षी ऑगस्टमध्ये होणाऱ्या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या स्पर्धेतून विरोधक बाहेर पडले आहेत. आसाममधील राज्यसभेच्या दोन आणि त्रिपुरातील एका जागेसाठी गुरुवारी मतदान झाले.
नागालँडमधील एकमेव राज्यसभेच्या जागेवर भाजपा उमेदवार आणि त्यांच्या महिला शाखेचे प्रदेशाध्यक्ष एस फांगनॉन कोन्याक यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे संसदेच्या वरिष्ठ सभागृहात स्थान मिळविणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या महिला ठरल्या.
आसाममधील काँग्रेसच्या रिपुन बोरा आणि राणी नारा यांचा राज्यसभेचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर, आपने राज्यातील पाचही जागा जिंकल्या. आता 'आप'चे संख्याबळ वरच्या सभागृहात आठ जागांवर पोहोचले आहे.
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे संख्याबळ पाच जागांपेक्षा कमी झाले आहे. याआधी १९९० मध्ये राज्यसभेत काँग्रेसच्या १०० पेक्षा जास्त जागा होत्या. त्यावेळी देशातील सर्वात जुना पक्ष सत्तेत होता. राज्यसभेत त्यांचे १०८ सदस्य होते.
यानंतर राज्यसभा निवडणुकीत त्याचे सदस्य सातत्याने कमी होत गेले. हे चक्र अव्याहतपणे सुरू आहे. एकामागून एक अनेक राज्यांतील सरकारे काँग्रेसला गमवावी लागली आणि त्याचा परिणाम राज्यसभेतील सदस्यांच्या संख्येवरही झाला.
२०१४ मध्ये वरच्या सभागृहात भाजपाचे संख्याबळ ५५ होते. त्यानंतर अनेक राज्यांमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर पक्षाचा आकडा वाढतच गेला आणि अलीकडेच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकीत ४ राज्यात भाजपाने सत्ता स्थापन केली. आणि आता त्यांनी राज्यसभेत शंभरी आकडा गाठला आहे.