वाघिणीने झडप घालून गुराख्याला जबड्यात पकडले, म्हैशीनी एकीचे बळ दाखवत मालकाचे प्राण वाचवले By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 09:12 AM 2021-04-08T09:12:29+5:30 2021-04-08T09:19:13+5:30
घरातील पाळीव मुक्या प्राण्यांना त्या घरातील व्यक्तींविषयी ओढ असल्याची अनेक उदाहरणे तुम्ही पाहिली किंवा ऐकली असतील. मांजर, कुत्र्यासारखे प्राणी तर आपल्या मालकासाठी प्रसंगी जीवही धोक्यात घालतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. संकटात सापडलेल्या मालकाचे प्राण म्हैशींनी वाचवल्याची घटना घडली आहे.
मध्य प्रदेशमधील बांधवगडच्या जंगलामध्ये वाघिणीने केलेल्या हल्ल्यामुळे एक गुराखी मृत्यूच्या दारात पोहोचला होता. मात्र त्याच्या पाळीव म्हैशींनी एकीचे बळ दाखवत त्याचे प्राण वाचवले.
ही घटना वाघांचा अधिवास असलेल्या बांधवगड टायगर रिझर्व्हच्या जंगलात घडली आहे. बांधवगडच्या जंगलांच्या आसपास असलेल्या गावातील गुराखी अनेकदा आपल्या पाळीव प्राण्यांना चरवत असताना वाघांचे वास्तव्य असलेल्या परिसरात पोहोचतात.
उमरिया जिल्ह्यातील बांधवगड टायगर रिझर्व्हच्या शेजारी असलेला कोठिया गाव घनदाट जंगलाने वेढलेला आहे. येथे रामकिशोर यादव हा गुराखी आपल्या म्हैशींना जंगलात चरण्यासाठी घेऊन गेला होता. म्हैशींचे चरून झाल्यानंतर त्याने त्यांना जंगलातीलच एका पाणवठ्यावर पाणी पाजले आणि त्यांना गावाच्या दिशेने हाकवले. मात्र त्याचवेळी जंगलातील घनदाट झाडीत लपलेल्या वाघिणीने अचानक त्याच्यावर झडप घातली.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे रामकिशोर यादव घाबरला. त्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, आपल्या मालकाचा आवाज ऐकून म्हैशी सावध झाल्या. त्यांनी आपल्या मालकाच्या दिशेने धाव घेतली. म्हैशींची एकत्रितपणे चाल करत येणारी झुंड पाहून वाघीण गडबडली आणि जंगलाच्या दिशेने पळून गेली.
म्हैशींनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या गुराख्याचे प्राण वाचले. त्याला किरकोळ जखमा झाल्या. दरम्यान, जखमी गुराख्याने या प्रकाराची माहिती फोनवरून ग्रामस्थ आणि वन विभागाला दिली. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी धाव घेत जखमी गुराख्याला रुग्णालयात दाखल केले. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.