तेव्हाही पक्षनेतृत्वावरून काँग्रेसमध्ये पडली होती उभी फूट, झाली होती मोठी उलथापालथ.... By बाळकृष्ण परब | Published: August 24, 2020 05:39 PM 2020-08-24T17:39:14+5:30 2020-08-24T20:03:39+5:30
- बाळकृष्ण परब - काँग्रेसच्या अनेक वर्षांच्या इतिहासामध्ये पक्षात अनेक वेळा फूट पडली आहे. मात्र थेट पक्षनेतृत्वाविरोधात आवाज उठवून पक्षात उघड दोन गट पडण्याचे प्रकार क्वचितच घडले आहेत. काँग्रेसमध्ये अशी मोठी फूट १९६७ ते १९७१ या काळात पडली होती. त्यावेळच्या फुटीचा पार्श्वभूमी आणि त्याच्या परिणामांचा घेतलेला हा आढावा. 23 ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून केलेली नेतृत्व बदलाची मागणी, त्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षातील या ज्येष्ठ नेत्यांच्या हेतूवर घेतलेली शंका आणि कार्यकारिणीच्या बैठकीत सुरू असलेली खडाखडी यामुळे काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. जुनेजाणते आणि तरुण असे दोन गट पक्षामध्ये पडल्याचे सध्या दिसत आहेत. तसेच पक्षामध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या अनेक वर्षांच्या इतिहासामध्ये पक्षात अनेक वेळा फूट पडली आहे. मात्र थेट पक्षनेतृत्वाविरोधात आवाज उठवून पक्षात उघड दोन गट पडण्याचे प्रकार क्वचितच घडले आहेत. काँग्रेसमध्ये अशी मोठी फूट १९६७ ते १९७१ या काळात पडली होती. त्यावेळच्या फुटीचा पार्श्वभूमी आणि त्याच्या परिणामांचा घेतलेला हा आढावा...
स्वातंत्र्य चळवळीत देशाचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसने स्वातंत्र्योत्तर काळातही लोकशाही मार्गाने केंद्रातील सत्ता मिळवली. मात्र त्यावेळी देशात काँग्रेसला आणि पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाला आव्हान देईल, असा कुणी नेता त्यावेळी नव्हता. मात्र नेहरूंचे एकमुखी नेतृत्व असले तरी पक्षामध्ये सामूहिकपणे निर्णय घेतले जात होते.
मात्र, १९६४ मध्ये नेहरूंचे निधन आणि नंतर लालबहादूर शास्त्री यांचा अकाली मृत्यू, यामुळे काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. त्यातच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी इंदिरा गांधी यांना नेतृत्वासाठी पुढे आणले. १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेस निसटत्या बहुमतासह सत्तेत आली.
अशा परिस्थितीत इंदिरा गांधी ह्या आपल्या कलाने निर्णय घेतील, असा काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचा होरा होता. मात्र इंदिरा गांधी यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे इंदिरा गांधी आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांमध्ये खटके उडायला लागले होते.
त्यातूनच १९६७ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये दोन गट पडले. मोरारजी देसाई, के. कामराज, एस. निजलिंगप्पा, अतुल्य घोष, स.का. पाटील, नीलम संजीवा रेड्डी यासारख्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी बंडाचा झेंडा उभारला, त्यामुळे निवडणुकीनंतर केवळ दोन वर्षात इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकार अल्पमतात आले.
काँग्रेसमधील या फुटीची जाहीर ठिणगी १९६९ मध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी पडली. काँग्रेसने नीलम संजीव रेड्डी यांना उमेदवारी दिली. मात्र इंदिरा गांधी यांना रेड्डी यांची उमेदवारी मान्य नव्हती. इंदिरा गांधींनी रेड्डींऐवजी व्ही. व्ही. गिरी यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. अखेरीस या निवडणुकीत व्ही. व्ही. गिरी यांचा विजय झाला.
त्यानंतर काँग्रेसमध्ये दोन गट पडले. एकीकडे ज्येष्ठ काँग्रेसी नेत्यांनी संघटना काँग्रेस नावाने वेगळा पक्ष स्थापन केला. इंदिरा गांधींसाठी हा कठीण काळ होता. याचदरम्यान इंदिरा गांधींना बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि संस्थानिकांचे तनख्ये बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे डावे पक्ष इंदिरा गांधींच्या नेतृत्वावर खूश झाले.
त्यानंतर, इंदिरा गांधी यांनी लोकसभा निवडणूक मुदत संपायच्या एक वर्ष आधीच घेण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीसाठी इंदिरा गांधींनी 'गरिबी हटाओ'चा नारा दिला. हा नारा तेव्हा देशात खूप लोकप्रिय झाला.
या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने तब्बल ३५२ जागा जिंकल्या. तर काँग्रेसच्या मतदानाच्या टक्केवारीत तीन टक्क्यांनी वाढ झाली. तर संघटना काँग्रेसची दाणादाण उडाली. संघटना काँग्रेसच्या २३८ उमेदवारांपैकी केवळ १६ जणांचा विजय झाला. तर ११४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
१९७१ मधील या इंदिरा लाटेमध्ये संघटना काँग्रेसचे अनेक नेते पराभूत झाले. मोरारजी देसाई वगळता सर्व नेते पराभूत झाले. नीलम संजीव रेड्डी आंध्र प्रदेशमधून पराभूत झाले. तर तारकेश्वरी सिन्हा, अशोक मेहता, यमनालाल बजाज, सुचेता कृपलानी आणि अतुल्य घोष हे सर्व नेते पराभूत झाले.
स्वाभाविकच, या निवडणूक निकालांमुळे इंदिरा गांधींच्या नेतृत्वाबाबत निर्माण करण्यात आलेले सर्व प्रश्न निकाली निघाले आणि देशात इंदिरा युगाची सुरुवात झाली.