रशिया अन् यूक्रेनमधील युद्ध संपणार?; PM मोदींच्या दौऱ्यानंतर पुतिन यांचं एक पाऊल पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 03:04 PM2024-09-05T15:04:42+5:302024-09-05T15:11:14+5:30

गेल्या दीड वर्षापासून रशिया आणि यूक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. त्यात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी यूक्रेनसोबत शांतता चर्चेवर मोठं विधान केले आहे. रशिया आणि यूक्रेन यांच्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठी भारत आणि चीन किंवा ब्राझील मध्यस्थीची भूमिका निभावू शकतात असं त्यांनी म्हटलं आहे.

पुतिन यांनी इकॉनोमिक फोरममध्ये म्हटलं की, आमचं उद्दिष्ट यूक्रेनच्या डोनबास परिसरावर कब्जा करणं हे आहे. रशियन सैन्य हळूहळू कुर्स्कमधून यूक्रेन सैन्याला मागे ढकलत आहे. त्यात पुढे पुतिन यांनी शांतता चर्चेवर भाष्य केले.

पुतिन यांचं हे विधान जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी अलीकडेच युक्रेन आणि त्याआधी रशियाचा दौरा करून आले तेव्हा आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दोन्ही दौरे खूप महत्त्वपूर्ण होते आणि जागतिक स्तरावरही भारतीय पंतप्रधानांच्या या दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली.

२०२२ मध्ये जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा तुर्कीने दोन्ही देशांदरम्यान तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या अटींची कधीच अंमलबजावणी झाली नाही. आता पूर्वीचे प्रयत्न नव्याने चर्चा सुरू करण्यासाठी त्याचा आधार वापरला जाऊ शकेल असं रशियाच्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम (EEZ) मधील चर्चेदरम्यान पुतिन म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुलै महिन्यात रशियाचा दौरा केला होता. त्यांचा हा दौरा नाटो समिटवेळी झाला होता. त्यावेळी राष्ट्रपती पुतिन यांची गळाभेट घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो चर्चेत होता. त्यावेळी युद्धाच्या मैदानातून शांततेचा मार्ग निघू शकत नाही असं मोदींनी म्हटलं होते.

या दौऱ्यावेळी पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियातील सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ सेंट एँड्रयू द एपोस्टलनं सन्मानित केले होते. परंतु यूक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की मोदींच्या दौऱ्याने नाराज होते त्यांनी जाहीरपणे ही नाराजी बोलून दाखवली होती.

रशियाचा दौरा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ ऑगस्टला यूक्रेन दौऱ्यावर गेले होते. पोलंडहून ते ट्रेनने कीवला पोहचले. तिथून झेलेन्स्की यांच्यासोबत नॅशनल म्युझियमला गेले. या दोन्ही नेत्यांची तिथे भेट झाली. त्याचे फोटो व्हिडिओ समोर आले.

या दौऱ्यातही यूक्रेननं वेळ न दवडता शांततेने तोडगा काढावा. चर्चेतून मार्ग निघू शकतो. आपल्याला या दिशेने पाऊले टाकावी लागतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं. झेलेन्स्की यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करू असं आश्वासन मोदींनी दिले होते.

काही दिवसांआधी मी राष्ट्रपती पुतिन यांना भेटलो होतो, तेव्हा माध्यमांसमोर खुलेपणाने सांगितले, ही युद्धाची वेळ नाही. कुठल्याही समस्येचा तोडगा युद्धाच्या मैदानात कधीही होऊ शकत नाही असं मोदींनी पुतिन यांना भेटीत सांगितले होते.

रशिया आणि यूक्रेन यांच्या युद्धात भारत सातत्याने शांततेचं आवाहन दोन्ही देशांना करत आहे. भारताने नेहमी हा वाद लवकरात लवकर शांततेत मिटवावा अशी भूमिका घेतली आहे. यूक्रेन आणि रशिया वादात भारत शांततेची भूमिका निभवायला तयार आहे असं मोदींनी झेलेन्स्की यांना सांगितले होते.