आखाड्याबाहेरील 'कुस्ती'! हरियाणात 'राजकीय दंगल', विनेश फोगाटचे दावे अन् मोठे खुलासे By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 04:40 PM 2024-10-03T16:40:21+5:30 2024-10-03T16:47:35+5:30
विनेश फोगाट हरियाणा विधानसभेच्या रिंगणात आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये मुख्य लढत आहे. नेहमीप्रमाणे यावेळी देखील कुस्तीपटूंमुळे ही निवडणूक चर्चेत आली.
भारताची माजी महिला कुस्तीपटू विनेश फोगाट जुलाना या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर नशीब आजमावत आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या तत्कालीन अध्यक्षांविरोधातील आंदोलन असो की मग ऑलिम्पिक २०२४ मध्ये घडलेला सर्व प्रकार... विनेश नवनवीन खुलासे करत आहे.
विनेशने या सर्व घटनांचा दाखला देत भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. बुधवारी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी विनेशसाठी एक सभा घेतली. याआधी आणि या सभेतून विनेशने काँग्रेसने केलेली मदत सांगताना भाजपावर सडकून टीका केली.
विनेश प्रचारादरम्यान तिच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील अपात्रतेच्या निर्णयाबद्दल भाष्य करताना दिसली. त्या वाईट काळात मला कोणाची साथ मिळाली नसल्याचे विनेशने आवर्जुन सांगितले.
अलीकडेच तिने सांगितले की, ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर तिला भारत सरकारकडून एकच फोन आला होता. मात्र आता हा फोन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होता, असा खुलासा विनेशने केला. मात्र विनेशने पंतप्रधान मोदींसोबत त्यावेळी संवाद साधला नव्हता. विनेशने यावेळी भारतीय अधिकाऱ्यांनी ठेवलेली अट मान्य केली नाही. त्यामुळे तिने पंतप्रधान मोदींसोबत बोलण्यास नकार दिला, असा खुलासा तिने केला.
जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतशी चुरस वाढत चालली आहे. विनेश फोगाट दिवसेंदिवस नवे खुलासे करत आहे. पाच तारखेला हरियाणात मतदान होणार आहे.
आम्ही जंतरमंतरवर आंदोलन करत असताना प्रियंका गाधींनी मोठ्या बहिणीप्रमाणे प्रोत्साहन दिले आणि दीपेंद्र हुड्डा यांनी भावाप्रमाणे आधार दिला. असा भाऊ आणि बहीण मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आता मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, जेणेकरुन एकत्रितपणे आपण जुलानाला नवीन उंचीवर नेऊ शकू. तुमच्या पाठिंब्याशिवाय हा विजय शक्य नाही, असे विनेशने एका सभेला संबोधित करताना म्हटले.