विनेश फोगटला भारतीय रेल्वेत किती पगार मिळत होता? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 05:18 PM2024-09-06T17:18:21+5:302024-09-06T17:26:48+5:30

Vinesh Phogat : भारतीय महिला कुस्ती स्टार विनेश फोगटने अलीकडेच तिच्या रेल्वे नोकरीचा राजीनामा दिला आहे आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगटचं सुवर्णपदक काही ग्रॅम वजनाने हुकलं होतं. त्यानंतर निराश झालेल्या विनेश फोगटने कुस्तीला रामराम ठोकला. त्यानंतर आता विनेश राजकीय आखाड्यात उतरली आहे.

विनेश फोगट आणि बजरंग पुनिया या कुस्तीपटूंनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. मात्र या पक्ष प्रवेशाआधी विनेशने सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे.

उत्तर रेल्वेमध्ये ओएसडी म्हणून कार्यरत असलेल्या विनेशने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन राजीनाम्याचे पत्र पोस्ट केलं आहे. कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणांमुळे ही नोकरी सोडत असल्याचे विनेशने सांगितलं.

भारतीय रेल्वेची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय आणि अभिमानाचा काळ आहे. माझ्या आयुष्याच्या या क्षणी, मी रेल्वे सेवेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि भारतीय रेल्वेच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे माझा राजीनामा सुपूर्द केला आहे, असं विनेशने म्हटलं.

विनेश उत्तर रेल्वेमध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (ओएसडी) म्हणून कार्यरत होती. पण रेल्वेमध्ये ओएसडी/स्पोर्ट्स जॉबसाठी पगार काय आहे आणि निवड कशी होते याची माहिती जाणून घेऊया.

भारतीय रेल्वे क्रीडा अंतर्गत विविध पदांची भरती करते. या अंतर्गत जो उमेदवार निवडला जातो, त्याला त्या पदानुसार वेतन दिले जाते. विनेशला रेल्वेमध्ये महाव्यवस्थापक, बडोदा हाऊसमध्ये ओएसडी/स्पोर्ट्स म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

विनेशना लेव्हल ७ द्वारे कनिष्ठ वेतनश्रेणीमध्ये ग्रेड ५४०० अंतर्गत पगार देण्यात आला. माध्यमांच्या वृत्तानुसार विनेशला रेल्वे प्रतिमहिना १ लाख रुपये पगार देत होती. याशिवाय या स्तरावरून मिळणारे भत्तेही दिले जात होती. रेल्वे मंत्रालय क्रीडा कोट्याअंतर्गत वेगवेगळ्या झोनसाठी वेळोवेळी भरती जारी करत असते.