अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात? By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 04:31 PM 2024-10-27T16:31:25+5:30 2024-10-27T16:41:27+5:30
Baramati Assembly election 2024 Ajit pawar vs yugendra pawar Explained: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी यावेळची विधानसभा निवडणूक त्यांच्या राजकीय कारकीर्दीला वळण देणारी ठरणार आहे. त्यामुळेच बारामती विधानसभा निवडणूक राज्यात सगळ्यात महत्त्वाच्या लढतींमध्ये पहिल्या क्रमाकावर आहे. अजित पवारांनी बंड केलं आणि बारामतीनं महाराष्ट्रासह देशातील राजकारणाचं लक्ष वेधून घेतलं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीवर कोणत्या पवारांचं वर्चस्व? या प्रश्नाचं उत्तर मिळालं. हीच बारामती आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात हॉट सीट ठरलीये. आधी भावजय विरुद्ध नणंद अशी लढत झाली. आता काका विरुद्ध पुतण्या अशी राजकीय लढाई महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे!
बारामती विधानसभा मतदारसंघात काका-पुतणे अर्थात अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात लढत होणारेय. पण, ही लढाई अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच असणार आहे. दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागलीये. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचा सुपुत्र आहेत. लोकसभा निवडणुकीपासूनच युगेंद्र पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली होती.
या विधानसभा निवडणुकीचं गणित समजून घेण्याआधी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं, जाणून घेणं महत्त्वाचं आहे... २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात भाजपने उमेदवार दिला होता. गोपीचंद पडळकर यांना बारामतीतून उमेदवारी दिली गेली होती. पण, बारामतीकरांनी अजित पवारांना भरभरून मतदान केलं. अजित पवारांना १ लाख ९५ हजार ६४१ इतकी मते मिळाली होती. तर गोपीचंद पडळकर यांना अवघी ३० हजार ३७६ मते मिळाली होती.
त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. अडीच वर्षानंतर सरकार कोसळलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीचे राजकीय भूकंप झाले. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळवला. या सगळ्या घडामोडीनंतर यावर्षी म्हणजेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार पहिल्यांदा बारामतीच्या मैदानात आमने-सामने आल्याचं दिसलं.
२०१९ मध्ये भरभरून मतदान करणाऱ्या बारामतीकरांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना मोठा झटका दिला. सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा १ लाख ५३ हजार इतक्या मताधिक्याने पराभव केला. याच निकालानं अजित पवारांची चिंता वाढली. कारण ज्या बारामती विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार आमदार आहे, त्याच मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना मोठं मताधिक्य मिळालं.
बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना १ लाख ४३ हजार ९४१ मते मिळाली, तर सुनेत्रा पवार यांना ९६ हजार ५६० मते मिळाली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल १ लाख ६५ हजार २६५ मतांच्या मताधिक्याने विजयी झालेल्या अजित पवारांसाठी हा मोठा झटका ठरला. अजित पवार 1991 पासून बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवत आलेत. महत्वाचं म्हणजे या मतदारसंघातून ते एकदाही पराभूत झालेले नाहीत. ते 2019 च्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झालेले उमेदवार ठरले होते.
लोकसभा निकालानंतर बारामतीतील राजकीय समीकरणं बदलल्याचं दिसलं. आता शरद पवारांनी युगेंद्र पवारांना निवडणूक रिंगणात उतरवलंय. युगेंद्र पवारांची ही पहिलीच निवडणूक असली तरीही लोकसभेपासून ते राजकारणात सक्रीय आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची साथ सोडण्याची भूमिकाही लोकांना आवडली नसल्याचे दिसले.
लोकसभा निवडणुकीपासूनच अजित पवार बारामतीतील जनमताचा कानोसा घेताना दिसत आहे. त्यांनी तशी विधानंही केली. महत्त्वाचं म्हणजे विकासाचा मुद्दा ते सातत्याने मांडत आहेत. तो किती प्रभावी ठरतो, यावरही निवडणुकीचं गणित अवलंबून असेल. पण, या निवडणुकीत अजित पवारांना मतदारांपर्यंत पोहोचणं कठीण होऊ शकतं.
अजित पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांना राज्यभर फिरावं लागणार आहे. त्यांच्या पक्षाचे ते प्रमुख प्रचारक असतील. त्यामुळे त्यांना पूर्णपणे बारामती विधानसभा मतदारसंघात राहता येणार नाही. त्यांच्या कुटुंबातील आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदारसंघ पिंजून काढावा लागेल. दुसरीकडे युगेंद्र पवारांच्या बाबतीत असं असणार नाही. नेहमीप्रमाणे शरद पवार शेवटची सभा घेतील, पण युगेंद्र पवारांनी आधीच संवाद यात्रा काढून मतदारसंघात चिन्ह पोहोवत तयारी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना धोका दिल्याचा मुद्दा, त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी काही घटना, शरद पवारांबद्दल भाजप नेत्यांकडून केली गेलेली विधाने या गोष्टींचा फटका बसला. तसे अजित पवारही बोललेत. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांची साथ सोडल्याचा मुद्दा असेल. दुसरीकडे शरद पवारांनीही बारामतीत नातवाला उतरवून कडवं आव्हान उभं केलं आहे. या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या रणनीतीला अजित पवार कसे तोंड देणार? कामाच्या मुद्द्यावर बारामतीकर मत देणार का? हाही एक यक्षप्रश्न आहे. कदाचित लोकसभेला सुप्रिया सुळे, विधानसभेला अजित पवार, असाही पॅटर्न दिसू शकतो. पण, मतदानापर्यंत राजकारण कसे फिरेल, त्यावरच हा निकाल अवलंबून असेल.