Vidhan Parishad Election Result: भाजपानं पाठिंबा काढला अन् शिवसेनेचा उमेदवार पडला; एकटे देवेंद्र फडणवीस पडले मविआवर भारी By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 01:17 PM 2021-12-14T13:17:31+5:30 2021-12-14T13:25:17+5:30
Vidhan Parishad Election Result; राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपानं बाजी मारली असून विदर्भातील दोन्ही जागांवर विजय मिळवण्यात पक्षाला यश आलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची अनेक मतं फुटल्याने मोठा धक्का बसला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील सर्वच चित्र पालटलं. भाजपा-शिवसेना युतीत निवडणूक लढले. जनतेचा कौलही महायुतीच्या बाजूने आला परंतु मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेने भाजपासोबत फारकत घेत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली.
गेल्या २ वर्षात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आहे. या काळात विधान परिषद निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. यात भाजपाविरुद्ध हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढत आहेत.
पंढरपूरची जागा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपानं ताब्यात घेतली. तर झेडपी, पंचायत समितीतही सर्वाधिक जागा भाजपानं जिंकल्या. नुकतेच विधान परिषदेच्या जागांचे निकाल लागले. यातही भाजपानं बाजी मारली.
नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले तर अकोला येथून भाजपाचे वसंत खंडेलवाल यांनी शिवसेनेला धूळ चारली. या दोन्ही निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण खुद्द भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील जागा प्रतिष्ठेच्या केल्या होत्या.
काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण आणि महाविकास आघाडी पक्षातील कुरबुरी यावर एकटे देवेंद्र फडणवीस भारी पडल्याचं चित्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालाने पाहायला मिळाले. नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे तर अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात भाजपाचे वंसत खंडेलवाल विजयी झाले.
देवेंद्र फडणवीसांनी केलेले अचूक नियोजन कामाला आले आणि विदर्भातील दोन्ही जागा भाजपाला मिळवण्यात यश आले. स्ट्रॅटेजी ठरवणं, नियोजन, मतदारांशी संवाद साधणं, ज्या रिसॉर्टमध्ये सगळ्यांना ठेवलं होतं, तिथे दोन दिवस अगोदर जाऊन मार्गदर्शन, मतपत्रिका कशी भरायची इथपासून सगळ्या गोष्टी फडणवीसांनी समजावल्या होत्या
सगळ्यात महत्वाचे म्हणजे अकोला विधान परिषदेचे जागेवर शिवसेनेचे उमेदवार ३ टर्म निवडून आले आहेत. परंतु यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला परावभावाचा झटका सहन करावा लागला. शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया गेल्या तीन टर्मपासून आमदार होते. त्यांचा पराभव हा शिवसेनेसाठी धक्का मानला जातोय.
देवेंद्र फडणवीसांच्या मास्टर स्ट्रटेर्जीमुळे महाविकास आघाडीची मते फुटली. भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांना ३६२ मते मिळाली तर काँग्रेसनं ऐनवेळी पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मते पडली. तर काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांना १ मत तर ५ मते अवैध ठरली. नागपूरमध्ये भाजपने जागाच जिकली नाही तर महाविकास आघाडीची मते फोडण्याची किमया केली.
अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात वसंत खंडेलवाल यांना ४४३ मते मिळाली. तर, शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना ३३४ मते मिळाली. महाविकास आघाडीचे जवळपास ८० मते फुटली असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय ३१ मते अवैध ठरली.
यावर भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेला टोला लगावला. आतापर्यंत शिवसेना भाजपाच्या पाठिंब्यावर निवडून येत होती. याआधी शिवसेनेचे जे उमेदवार विजयी झाले ते भाजपामुळे झाले होते. परंतु आता शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली त्यामुळे भाजपाने याठिकाणी उमेदवार दिला आणि तो जिंकून आला आहे असं मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, भाजपने निवडणुकीत घोडेबाजार केला. त्यांच्याच मतदारांवर विश्वास नव्हता, म्हणून त्यांना शहराबाहेर नेले. आपल्याच मतदारांवर विश्वास नसलेला हा पक्ष आहे. भाजपने लोकशाहीचा अपमान केला आहे. हे लोकशाहीला घातक. भाजपच्या दाव्यावर भविष्यात उत्तर देऊ असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे.