Parambir Singh: 'जिलेटीनपेक्षा 100 कोटींची चिठ्ठी अधिक स्फोटक'; कोणत्याही क्षणी केंद्राची महाशक्ती ED ची एन्ट्री शक्य By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 11:16 AM 2021-03-21T11:16:52+5:30 2021-03-21T11:36:30+5:30
parambir singh allegation on Anil deshmukh 100 crore collection per month: दिल्लीत शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटलांना (Jayant Patil) तातडीने बोलावून घेतले आहे. पवार आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि या दोन बड्या नेत्यांच्या उपस्थितीत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली आहे. मुंबई : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारला सचिन वाझे (Sachin Vaze) आणि अँटालिया स्फोटक प्रकरण खूपच जड जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दिल्लीत शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटलांना (Jayant Patil) तातडीने बोलावून घेतले आहे.
पवार आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि या दोन बड्या नेत्यांच्या उपस्थितीत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यातच महाराष्ट्रातील जिलेटीन प्रकरणापेक्षा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांची (Param Bir Singh) 100 कोटींच्या वसुलीची चिठ्ठी अधिक विस्फोटक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Anil Deshmukh asked Sachin Vaze to collect Rs 100 cr for him per month.)
विरोधात असलेल्या भाजपाने या चिठ्ठीला जिलेटीन केसपेक्षाही जास्त विस्फोटक असल्याचे म्हटले आहे. भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची आणि नार्को टेस्टची मागणी केली आहे.
विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप केला आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकार आहे, मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना एवढ्या गंभीर आरोपांचे पत्र पाठविले असेल. परमबीर यांनी याची माहिती मुख्यमंत्री, शरद पवार, अजित पवार यांना दिल्याचा दावाही केला आहे.
ईडीची एन्ट्री? जिलेटीन स्फोटक, सचिन वाझे अटक आणि त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी या साऱ्या खेळात आधीत केंदाची एनआयए तपास करत असताना आता महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप झाल्याने या प्रकरणात ईडीची कोणत्याही क्षणी एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात आता केंद्रीय तपास संस्थांची मागणी केली आहे. यामुळे लवकरच ईडीची देखील या प्रकरणात एन्ट्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
परमबीर सिंग व्हीआरएस घेणार? ज्या प्रकारे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंगांची हकालपट्टी झाली आणि ज्या प्रकारे त्यांनी मुख्यमंत्र्यांना उघडउघड पत्र पाठवून ते व्हायरल केले त्या त्यांच्या आक्रमकतेवरून आता परमबीर सिंग व्हीआरअस घेण्याची चर्चा सुरु झाली आहे.
परमबीर सिंगांनी सरकारसोबत घेतलेले वैर पाहून त्यांना पुढे काम करणे कठीण जाण्याची शक्यता आहे. यामुळे जर महाविकास आघाडी सरकार राहिले तर ते व्हीआरएस घेऊ शकतात.
दरम्यान तो मेल आयडी नेमका कोणाचा यावरून मुख्यमंत्री कार्यालयामध्ये गोंधळ उडालेला असताना परमबीर सिंगांनीच याचा खुलासा केला आहे. तो मेल आयडी माझाच असून मीच तो मेल मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, राज्यात भाजपाने आंदोलनाची हाक दिली आहे. यामुळे गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नागपुरातील निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.