Gram Panchayat Election Results: राज्यातील 'या' बड्या नेत्यांना बसले धक्के; तर 'या' मोठ्या नेत्यांना जनतेनं घेतलं डोक्यावर By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 01:34 AM 2021-01-19T01:34:13+5:30 2021-01-19T01:46:44+5:30
राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकालानंतर राजकीय पक्षांनी विजयाचे दावे-प्रतिदावे केले असले तरी या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील आघाड्यांनीच बाजी मारल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी आमदार-खासदारांपैकी काही लोकप्रतिनिधींना आपापली गावे राखली. मात्र, काही गावांत मतदारांनी नेत्यांना जबरदस्त आणि अनपेक्षित धक्केही दिले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे मूळ गाव असलेल्या खानापूर (ता. भुदरगड) ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून, तिथे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाची सत्ता आली आहे.
अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघात १५१ पैकी १२४ ग्रामपंचायतींमध्येे काँग्रेसचे पॅनल विजयी झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कोथळी या गावात ११ पैकी राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळाल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील कोंडवे गावात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पॅनलने खासदार उदयनराजे भोसले यांच्या पॅनलचा पराभव केला.
म्हैसाळ (ता. मिरज) ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला. त्यांचे सख्खे मेहुणे मनोज शिंदे-म्हैसाळकर यांची सत्ता उलथवत चुलत मेहुणे भाजपचे दीपक शिंदे यांनी बाजी मारली.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ७० पैकी ४७ ग्रामपंचायतीवर खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने झेंडा फडकवला
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा गृहतालुका असलेल्या साकोलीत भाजपने मोठी मुसंडी मारली असून १३ ग्रामपंचायतींवर वर्चस्व स्थापित केले.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या तालुक्यातील प्रभावक्षेत्रात अनेक मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली.
लोणी खुर्दमध्ये भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा पराभव झाला.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज ग्रामपंचायतीवर माजी मंत्री मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळवला आहे.
सोलापूर जिल्ह्यात माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना जोरदार धक्का बसला.
अमित देशमुख यांच्या बाभळगावात देशमुख यांच्या पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
कोराडी ग्रामपंचायत राखण्यात भाजपचे महामंत्री, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यश आले.
महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरी येथे त्यांच्या नेतृत्वातील पॅनेलने १३ पैकी ७ जागा जिंकल्या.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल तालुक्यात तीनपैकी एका ग्रा. पं. मध्ये महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.