"मी लैला अन् माझे हजारो मजनू"; ओवेसींनी घेतला अमित शहा, काँग्रेसचा समाचार By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 03:06 PM 2020-11-30T15:06:56+5:30 2020-11-30T15:11:54+5:30
Hyderabad municipal corporation election : हैदराबाद महापालिका निवडणुकीमुळे तेथील वातावरण तापले असून भाजपाने मोठी ताकद लावल्याने ओवेसींनी भाजपावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाची बी टीम असे आरोप एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर नेहमीच होत असतात. हैदराबाद महापालिका निवडणुकीमुळे तेथील वातावरण तापले असून भाजपाने मोठी ताकद लावल्याने ओवेसींनी भाजपावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.
ओवेसी यांनी नुकतेच ''माझे हाल असे आहेत, की मी लैला आहे, आणि माझे हजारो मजनू आहेत'', असे वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे.
सर्वच पक्ष मला लक्ष्य करून स्वत:चा फायदा करून घेत आहेत. भाजपाने हैदराबादमध्ये आलेल्या पुराकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप ओवेसींनी केला आहे.
दोन दिवसांपूर्वीच ज्यांना हैदराबादचं नाव बदलायचंय, त्यांच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील. पण तरीही हैदराबादचं नाव बदलणार नाही, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना लगावला होता.
भाजपनं या निवडणुकीत इतक्या लोकांना बोलावलंय की आता केवळ डोनाल्ड ट्रम्प यायचे राहिले आहेत. ते जरी आले तरीही काही होणार नाही. कारण मोदींनी त्यांना हात देत अबकी बार ट्रम्प सरकार म्हटलं होतं. पण ट्रम्प खड्ड्यात पडले. त्यांना लाख लाख वेळा मला जिन्ना म्हणावं. पण आम्ही जिन्नाच्या हाकेला प्रतिसाद दिलाच नव्हता. जे रजाकार होते, ते पाकिस्तानात गेले आणि जे प्रामाणिक होते, ते हैदराबादमध्येच राहिले, असेही ओवेसी म्हणाले होते.
यानंतर ओवेसींनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले होते. जर हैदराबादमध्ये अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या राहत असतील तर अमित शाह कारवाई का करत नाहीत, असा सवाल केला होता.
यावर अमित शहा यांनी हैदराबादमध्ये शक्तीप्रदर्शनावेळी ओवेसी यांनी एकदा लिहून द्यावे, नंतर रोहिंग्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी माझी असेल, असे आव्हान दिले. आम्ही जेव्हा कायदा करतो तेव्हा हे लोक संसदेमध्ये गोंधळ घालतात, असा टोलाही त्यांनी लगावला होता.
आता ओवेसी यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, बिहारमध्ये काँग्रेसने म्हटले की मी भाजपसोबत मते खाणारा आहे. बी टीम आहे. हैदराबादमध्ये काँग्रेस सांगतेय की, ओवेसी नको तर आम्हाला मत द्या. भाजपा काही वेगळेच सांगत आहे. मला याची चिंता नाही.
याचा अर्थ मी लैला आहे आणि प्रत्येकला माझा मुद्दा बनवून मत मिळवायची इच्छा आहे. हैदराबादची जनता हे सारे पाहत आहे. हैदराबादला आम्ही चांगले बनविण्याचे काम करत आहोत. आता जनताच निर्णय घेईल, असे ओवेसी म्हणाले.
शहांचे सल्लागार आंधळे, बहिरे हैदराबादमध्ये जेव्हा पूर आला होता तेव्हा ओवेसी आणि टीआरएस कुठे होती, असा सवाल अमित शहांनी केला होता. यावर ओवेसी यांनी सांगितले की, अमित शहांचे जे चमचे आहेत ते आंधळे, बहिरे आहेत. अकबरुद्दीन ओवेसी यांनी साडे तीन कोटींची मदत दिली. असदुद्दीन रोज गुडघाभर पाण्यातून फिरत होता. आमच्याकडे याचे फोटो आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येक घराला १०००० रुपयांची मदत मिळवून दिली.