‘अ’ची ‘ब’ला आणि ‘ब’ची ‘क’ला लावालावी करू नका!; जयंत पाटलांनी विरोधकांना फटकारले By मोरेश्वर येरम | Published: February 4, 2021 07:05 PM 2021-02-04T19:05:41+5:30 2021-02-04T19:16:36+5:30
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केलीय. पाहुयात जयंत पाटील काय म्हणाले... नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने लॉबींग सुरू केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याचीही टीका केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मात्र विरोधकांना सुनावलं आहे. "आम्ही तिन्ही पक्ष गुण्यागोविंदाने कारभार करत आहोत. त्यामुळे ‘अ’ची ‘ब’ला आणि ‘ब’ची ‘क’ला लावालावी करू नका", असं जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील सध्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरत आहेत. ते आज अमरावतीत आहेत.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेंतर्गत दर्यापूर, धामणगाव-चांदूर रेल्वे कार्यकारणीची सभा आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी जयंत पाटील यांनी कामकाजाचा आढावा घेऊन पुढील कार्यासाठी सूचना केली.
दरम्यान, नाना पटोले यांनी आज (४ फेब्रुवारी) रोजी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली.
यानंतर नाना पटोले यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला.
पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचं नाव आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. प्रदेशाध्यक्षपदासोबतच पटोले यांच्याकडे मंत्रिपदही दिली जाण्याची शक्यता आहे.