मोठा गौप्यस्फोट! ज्योतिरादित्य शिंदेंमुळेच प्रियंका चतुर्वेदींनी काँग्रेस सोडली; आग्रा येथे काय घडलं होतं? By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 03:27 PM 2021-07-09T15:27:31+5:30 2021-07-09T15:33:28+5:30
Role Of Jyotiraditya Scindia In Priyanka Chaturvedi Leaving Congress: विद्यमान शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याबाबत एका पुस्तकातून खुलासा झाला आहे. अचानक काँग्रेस सोडण्यामागे नेमकं काय होतं कारण? जाणून घ्या. ज्योतिरादित्य शिंदे यांनी भलेही मार्च २०२० मध्ये काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. परंतु त्यापूर्वी काँग्रेसला मिळालेल्या एका धक्क्यासाठी ते कारणीभूत ठरले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी अचानक काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
काँग्रेसमधून बाहेर पडून प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. पत्रकार राशिद किदवई यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकात किताब द हाऊस ऑफ सिंधियाजमध्ये असलेल्या उल्लेखाप्रमाणे प्रियंका चतुर्वेदी यांच्या काँग्रेस सोडण्यामागं ज्योतिरादित्य शिंदेंच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
२०१४ ते २०१९ पर्यंत प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेस पक्षातील सर्वात चर्चेत असलेल्या मुख्य प्रवक्त्यांपैकी एक होती. टीव्ही डिबेटमध्ये प्रियंका मोठ्या आक्रमकपणे पक्षाची बाजू ठामपणे मांडत होती. सोशल मीडियातही प्रियंका चतुर्वेदी सक्रीय होत्या.
मग लोकसभा निवडणुकीच्या ८ दिवसांपूर्वीच प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे ज्योतिरादित्य शिंदेही चकीत झाले. परंतु प्रियंका चतुर्वेदी यांच्या काँग्रेस सोडण्यामागे कुठेतरी ज्योतिरादित्य शिंदे यांचीच भूमिका होती.
मुंबईत राहणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी या मूळत: उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आहेत. २०१९ च्या निवडणुकीत उत्तर मुंबईतून त्यांना काँग्रेसचं तिकीट हवं होतं. परंतु पक्षाने उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसचं तिकीट दिलं. चतुर्वेदी पक्षाच्या या निर्णयानं खूप नाराज झाल्या.
हा प्रकार त्यावेळी घडला होता जेव्हा काँग्रेस पक्ष चतुर्वेदी यांना आग्रा येथून हेमामालिनी यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे स्थानिक नेते चिंतेत होते. तेव्हा ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसचे महासचिव आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी होते.
याचदरम्यान आग्रा येथे झालेल्या एका घटनेबाबत पक्षाने घेतलेल्या निर्णयानं प्रियंका चतुर्वेदी दु:खी झाल्या. तेव्हाच प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण सप्टेंबर २०१८ मधील आहे. जेव्हा प्रियंका चतुर्वेदी राफेल मुद्द्यावरून आग्रा येथे पत्रकार परिषद घेत होत्या.
यावेळी स्थानिक नेत्याच्या इशाऱ्यावर काही पार्टी कार्यकर्त्यांनी प्रियंका चतुर्वेदीसोबत गैरवर्तवणूक केली. परिस्थिती अशी झाली की प्रियंका चतुर्वेदी पत्रकार परिषद अर्धवट सोडून निघून गेल्या. इतकचं नाही तर त्यांच्यासोबत गैरवर्तवणूक करणारा शिवीगाळ देणारा युवक त्यांच्या रुममध्ये घुसला जिथे पत्रकार परिषद सोडून प्रियंका चतुर्वेदी बसल्या होत्या.
प्रियंका चतुर्वेदी यांनी घडलेल्या प्रकाराची तक्रार पक्षनेतृत्वाकडे केली. हे प्रकरण राहुल गांधींपर्यंत पोहचले तेव्हा त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी चर्चा केली. या घटनेनंतर शिंदे यांनी या प्रकाराला दोषी असणाऱ्या ८ नेत्यांना कारणे बताओ नोटीस जारी करून त्यांचे निलंबन केले.
परंतु ८ दिवसांतच या सर्व नेत्यांचे निलंबन रद्द करण्यात आले. माहितीनुसार, या स्थानिक नेत्यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांच्या सांगण्यावरून घेतला. या सर्व आरोपी कार्यकर्त्यांनी लिखित माफी मागितली आणि परत असं कृत्य करणार नाही असं सांगितले.
प्रियंका चतुर्वेदी यांनी पक्षाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. मी काँग्रेससाठी दुसऱ्या पक्षाशी लढते. परंतु माझ्या स्वत:च्या पक्षातील कार्यकर्ते असं गैरवर्तवणूक करतात त्यांना काहीही शिक्षा होत नाही. पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी गुंडांना जास्त महत्त्व दिलं जातं असं त्यांनी ट्विट करून म्हटलं होतं.
या घटनेनंतर सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी चर्चा केली परंतु घेतलेला निर्णय बदलण्यास शिंदे यांनी विरोध केला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्थानिक राजकीय परिस्थितीचा हवाला पक्ष नेतृत्वाला दिला. प्रियंका चतुर्वेदी यांना हे सहन झालं नाही म्हणून अचानक काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला असा खुलासा पुस्तकातून करण्यात आला आहे.