शरद पवार की उद्धव ठाकरे...कोण असावं पंतप्रधान?; शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांची स्वप्नं By प्रविण मरगळे | Published: February 11, 2021 11:36 AM 2021-02-11T11:36:38+5:30 2021-02-11T11:43:15+5:30
Sharad Pawar & Uddhav Thackeray: मराठी माणूस देशाचा पंतप्रधान व्हावा, ही सगळ्यांची इच्छा आहे, परंतु राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपलाच नेता पंतप्रधान व्हावा असं स्वप्न पडत आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठी माणूस पंतप्रधान व्हावा अशी अनेकांची इच्छा आहे, शरद पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत, सोनिया गांधींच्या परदेशी मुद्द्यावरून शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली
काँग्रेसमध्ये असते तर शरद पवार पंतप्रधानांच्या शर्यतीत आघाडीवर असते असं नेहमीच बोललं जातं, परंतु राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून अद्याप शरद पवारांचे पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही.
शरद पवार हे देशातील काही मोजक्या नेत्यांपैकी आहे, ज्यांचे सर्व राज्यातील नेत्यांची सलोख्याचे संबंध आहे, अलीकडच्या काळात शरद पवार यांचं यूपीएच्या चेअरमनपदासाठी नाव चर्चेत होतं, परंतु त्याचंही अद्याप काहीच झालं नाही
आता पंतप्रधानपदाचा मुद्दा चर्चेत येण्याचं कारण असं की...दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शरद पवारांनी देशाचं पंतप्रधान व्हावं असं विधान केले. राष्ट्रवादी नेत्यांनी केलेले विधान हे महाराष्ट्रासाठी नवं नसलं राज्यात झालेल्या नव्या आघाडीमुळे याची चर्चा तर नक्कीच होऊ शकते.
काय म्हणाले डॉ. अमोल कोल्हे? एका मराठी माणसानं देशाचं पंतप्रधान व्हावं हे प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न आणि इच्छा आहे, शरद पवारांनी पंतप्रधान व्हावं हे आमचं स्वप्न आहे, स्वप्न जर प्रत्येकाने मनावर घेतलं तर हे साकार व्हायला वेळ लागणार नाही. यूपीए चेअरमेन पदाबाबत भाष्य करू शकत नाही, पण मोदी सरकारने देशातील युवकांचा भ्रमनिराश केला आहे,
बेरोजगारी, महागाई प्रचंड वाढली आहे, २ कोटी लोकांना दरवर्षी रोजगार दिला जाणार हे मोदी सरकारने सांगितले होते, अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, आत्मनिर्भर भारत हे फक्त मुठभर भांडवलदारांसाठी आहे. त्यामुळे देश शरद पवारांकडे अपेक्षेने बघतो, शाश्वस्त विकासाच्या दृष्टीने शरद पवारांकडे पाहिलं जात आहे असं अमोल कोल्हे म्हणाले.
राज्यात गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळाला, एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मित्र बनले, त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं,
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले, या सत्तासंघर्षात महत्त्वाची भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत यांनीही काही महिन्यांपूर्वी एक विधान केले होते, उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान व्हावेत...त्यादृष्टीने शिवसेनेने महाराष्ट्र सोडून इतर राज्यातही आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
बिहार, मध्य प्रदेश येथील निवडणुकांमध्ये शिवसेनेने त्यांचे उमेदवार उतरवले होते, परंतु त्यांना यश आलं नाही, आता आगामी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठीही शिवसेना रणांगणात उतरली आहे. महाराष्ट्र वगळता इतर राज्यात शिवसेना असो वा राष्ट्रवादी दोन्ही पक्षांचा जनाधार नाही
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत, राज्यात शिवसेनेला ५६ आणि राष्ट्रवादीला ५४ जागांवर यश मिळालं आहे, तर लोकसभेत शिवसेनेचं १८ आणि राष्ट्रवादीचे ४ खासदार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पंतप्रधानपदाचं स्वप्न कधी पूर्ण होणार हे आगामी काळात दिसून येणार आहे.