मुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर? By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 05:21 PM 2020-08-07T17:21:46+5:30 2020-08-07T17:29:46+5:30
राजस्थानात गेल्या महिन्यापासून सुरू असलेला सत्तासंघर्ष अद्यापही संपताना दिसत नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट अशा स्वरुपात सुरू झालेला राजस्थानातील संघर्ष नंतर राज्यपालांकडे गेला.
राजस्थानातील सत्तासंघर्ष राज्यापालांनंतर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. मात्र गेहलोत यांनी राज्यस्थानात मध्य प्रदेशची पुनरावृत्ती होऊ दिलेली नाही.
काँग्रेसच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवून अशोक गेहलोत यांनी फोडाफोडीचं राजकारण होणार नाही, याची काळजी घेतली. एका बाजूला आमदारांची फोडाफोड टाळताना दुसऱ्या बाजूला भाजपा अधिक आक्रमक होणार नाही, याची काळजीदेखील मुख्यमंत्र्यांनी घेतली.
राजस्थानात सत्तासंघर्षाला सुरुवात होताच, काँग्रेसनं सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करताच विरोधी बाकांवरील भाजपा आक्रमक झाला. त्याचवेळी केंद्रीय तपास यंत्रणांकडून काँग्रेसच्या काही आमदारांच्या घरांवर छापेही टाकण्यात आले.
राजस्थानात इतकं काही घडत असताना माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्या वसुंधरा राजे शांत होत्या आणि आहेत. याचंच बक्षीस राजे यांना गेहलोत यांच्याकडून मिळालं की काय, अशी चर्चा सध्या राजस्थानात सुरू आहे.
वसुंधरा राजे माजी मुख्यमंत्री असल्यानं त्यांना सरकारी बंगला रिकामा लागणार होता. मात्र आता राजेंना बंगला रिकामा करावा लागणार नाही.
वसुंधरा राजे त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत, त्या पुन्हा आमदार म्हणून निवडून येईपर्यंत सरकारी बंगल्यात राहू शकतात. माजी मुख्यमंत्री आमदार असेपर्यंत त्याला टाईप वन प्रकारातला बंगला मिळेल, असा निर्णय गेहलोत सरकारनं घेतला आहे.
राजे जयपूरमधील सिव्हिल लाईन्समध्ये टाईप वन प्रकारातला बंगला मिळाला आहे. विशेष म्हणजे हा बंगला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळच आहे. राजे २०१३ ते २०१८ कालावधीत बंगला क्रमांक-१३ मध्ये वास्तव्यास होत्या. याच बंगल्याला त्यांना मुख्यमंत्री निवासस्थान घोषित केलं.
गेहलोत सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे राजेंना बंगला क्रमांक-१३ सोडावा लागणार नाही. आमदारकीचा कार्यकाळ संपेपर्यंत त्यांना इथं राहता येईल.
अशोक गेहलोत आणि वसुंधरा राजे यांच्यात असणारं राजकीय सामंजस्य कायमच चर्चेचा विषय राहिलं आहे. राजे मुख्यमंत्री असताना गेहलोत यांनी त्यांच्यावर थेट टीका केली नाही. भाजपा सरकारविरोधात ते फारसे रस्त्यावरही उतरले नाहीत.
राजे यांचं सरकार गेल्यावर गेहलोत सत्तेत आले. त्यानंतर वसुंधरा राजे राजकारणात फारशा सक्रिय दिसल्या नाहीत. गेहलोत यांच्या सरकारवर टीका करणं त्या टाळतात. त्यामुळेच राज्यातले इतर भाजपा नेते गेहलोत सरकारविरोधात खुलेपणानं उतरले असताना राजे त्यांच्यापासून काहीसं अंतर राखून होत्या.
भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे संयोजक आणि खासदार हनुमान बेनीवाल यांनी तर थेट मुख्यमंत्री गेहलोत यांच्यावर आरोप केले आहेत. राजे यांना फायदा व्हावा यासाठी गेहलोत मुद्दाम त्यांना बंगला रिकामा करण्यास सांगत नसल्याचा बेनीवाल यांचा आरोप आहे.
राजे बंगल्याच्या बदल्यात गेहलोत यांचं सरकार वाचवत असल्याचा आरोपदेखील बेनीवाल यांनी केला आहे.