बंगालमध्ये धुणीभांडी, मोलमजुरी करणाऱ्या महिलांना भाजपाने बनवले उमेदवार, असा सुरू आहे प्रचार By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 10:34 PM 2021-03-21T22:34:33+5:30 2021-03-21T22:38:56+5:30
West Bengal Assembly Elections 2021 : भाजपाने पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेली उमेदारांची काही नावे चर्चेचा विषय ठरत आहे. पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. आठ टप्प्यात होत असलेल्या मतदानासाठी भाजपाकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. दरम्यान, भाजपाने पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेली उमेदारांची काही नावे चर्चेचा विषय ठरत आहे.
यामधील दोन नावांची विशेष चर्चा सुरू आहे. भाजपाने या निवडणुकीसाठी दोन अशा महिलांना उमेदवारी दिली आहे ज्या मागास आणि वंचित समाजाशी संबंधित आहेत. यामध्ये आऊसग्राम विधानसभा मतदारसंघातून भाजपाने कलिता माझी यांना उमेदवारी दिली आहे. तर सालतोरा येथून भाजपाने ३० वर्षीय चंदना बाउरी यांना उमेदवारी दिली आहे. आता पंतप्रधान मोदी यांनी आपल्या प्रचारासाठी आले पाहिजे, अशी इच्छा कलिता माझी यांनी व्यक्त केली आहे.
३२ वर्षीय कलिता एका घरामध्ये धुणीभांडी करत असताना कुणीतरी त्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर फोन आला आणि त्यामध्ये त्यांना आऊसग्राम येथून उमेदवारी मिळाल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला त्यांना कुणीतरी थट्टा करतोय असे त्यांना वाटले. तिथून त्या दुसऱ्या घरी काम करण्यासाठी गेल्या. मात्र कामावरी घरी परतल्यावर त्यांच्या घराजवळ समर्थकांची गर्दी झाल्याचे त्यांना दिसले ते पाहून त्यांना धक्का बसला.
शेतकऱ्याची मुलगी आणि प्लंबरची पत्नी असलेल्या कलिता गेल्या अनेक वर्षांपासून रोज चार ते सहा घरांमध्ये धुणीभांडी करून संसार चालवतात. सध्या प्रचार करण्यासाठी त्यांनी सुट्टी घेतली आहे. पूर्व बर्दवान जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबाशी संबंधित असलेल्या कलिता यांनी निवडणुकीत विजय मिळाल्यास महिलांसाठी अनुकूल समाज बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
कलिता ह्या स्वत: पाचवी शिकलेल्या आहेत. मात्र गरीब मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्या देत आहेत. कलिता ह्या भाजपाच्या सदस्य असून, यापूर्वी पंचायत निवडणुकीत त्यांनी भविष्य आजमावले होते.
तर पश्चिम बंगालमधील सालतोरा विधानसभा मतदारसंघामधून भाजपाने ३० वर्षीय चंदना बाऊरी यांना उमेदवारी दिली आहे. कलिता यांच्याप्रमाणेच चंदना यासुद्धा गरीब कुटुंबातून आलेल्या आहेत. त्यांच्याकडे मालमत्तेच्या रूपात केवळ ३ बकऱ्या ३ गाई आणि एक झोपडी आहे. चंदना यांचे पती रोजंदारीवर काम करतात. त्यांची रोजची कमाई ४०० रुपये आहे.
चंदना ह्यासुद्धा पतीच्या मदतीसाठी कामावर जातात. जिल्हा भाजपाच्या वरिष्ठ सदस्य असलेल्या चंदना गंगाजलघाटीजवळील केलाई गावामधील आपल्या घरातून रोज सकाळी आठ वाजता बाहेर पडून प्रचाराला सुरुवात करतात. गरीबांचे शिक्षण, पिण्याचे पाणी आणि बलात्काऱ्यांवर कारवाई या तीन मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून त्या प्रचार करत आहेत. -