Talai Landslide: दु:खाची दरड! निसर्गरम्य तळीये गाव उद्ध्वस्त... सारं गाडलं गेलं...दुर्दैवी घटनेचे भीषण फोटो... By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 05:55 PM 2021-07-23T17:55:04+5:30 2021-07-23T18:17:16+5:30
Raigad mahad talai landslide news Update : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळीये गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यात तळीये गावातील अनेक कुटुंब दरडीखाली गाडली गेली आहेत. राज्यातील मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पुराचां पाणी साचलेलं असताना सर्वात मोठी दुर्घटना रायगडातील तळीये गावात घडली आहे. काल दुपारी चार वाजता दरड कोसळून तळीये गावातील अनेक घरं गाडली गेली आहेत.
दरडीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास ३२ घरं गाडली गेली असून यातून आतापर्यंत ३८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. नागरिकांचा प्रचंड रोष येथे पाहायला मिळतो आहे. महाडला संपूर्णपणे पुराच्या पाण्यानं वेढा होता. त्यामुळे बचावकार्यासाठी प्रशासनाला येथे पोहोचण्यास दुसरा दिवस उजाडला.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या तळीये गावासाठी कालचा पाऊस काळरात्र घेऊन आला...अवघ्या काही मिनिटांत गावातील ३५ घरांवर दरड कोसळली आणि एकच हाहाकार उडाला.
सततच्या पावसामुळे मोबाइल नेटवर्क, वीज पूर्णपणे खंडीत झाल्यानं घटनेची माहिती शासनापर्यंत पोहोचण्यासही खूप उशीर झाला. अशावेळी गावकऱ्यांनाच बचावकार्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.
दुर्घटना इतकी भीषण आहे की गावकऱ्यांच्या माहितीनुसार दरडीखाली जवळपास ८६ जण अडकल्याचं सांगण्यात येत आहे.
तळीये गावातील अनेक घरांचं मुसळधार पावसानं मोठं नुकसान देखील झालं आहे. एनडीआरएफची एक टीम घटनास्थळी बचावकार्य करत आहे.
गावालगतच्या इतर वाड्यांमधील नागरिकांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. पण दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांचा आक्रोश आणि आकांत पाहायला मिळत आहे.
तळीये गावातील काही संपूर्ण कुटुंबच्या कुंटुंब दरडीखाली गाडली गेल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत आणि ठाण्यातील गावकऱ्यांचे नातेवाईक देखील आता इथं पोहोचण्यास सुरुवात झाली आहे.
तळीये गावातील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी दोन, तर राज्य सरकारकूडन ५ लाखांची मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
तळीये गावातील दुर्घटनेनंतर आजही परिसरात पावसाची संततधार सुरूच असून सततच्या पावसामुळे बचावकार्यात देखील अडथळे येत आहेत.