मुख्यमंत्री शिंदेंच्या मदतीनं 'लाल डायरी'चं रहस्य उलगडणार?; कुणाची डोकेदुखी वाढणार? By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 03:59 PM 2023-09-09T15:59:50+5:30 2023-09-09T16:09:40+5:30
राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक मोठी राजकीय घटना घडली आहे. अशोक गहलोत सरकारमधून बडतर्फ केलेले मंत्री राजेंद्रसिंह गुढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे.
शिंदे यांनी राजेंद्र गुढा यांचे स्वागत केले आहे. राजस्थानच्या उदयपूरवाटी परिसरातील गुढा गावात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला, राजस्थानला पुढे घेऊन जाण्यासाठी याठिकाणी सत्ता परिवर्तन गरजेचे आहे असं शिंदेंनी म्हटलं.
त्याचसोबत सत्य बोलण्यासाठी त्यांनी मंत्रिपदाची पर्वा केली नाही अशा विचारधारेच्या लोकांची राजकारणात गरज आहे. राजेंद्र गुढा यांना आमच्याकडून पूर्ण मदत मिळेल. आम्ही जनतेसाठी काम करतोय. रोजगार, शेतकरी आणि कायदा सुव्यवस्था यावरून शिंदेंनी गहलोत सरकारवर हल्लाबोल केला.
राजेंद्र गुढा हे २ वेळा झुंझुनूच्या उदयपूरवाटी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेत. राजेंद्र गुढा या मतदारसंघातून २ वेळा बहुजन समाज पार्टीच्या तिकीटावर निवडून आले. त्यानंतर बसपाची साथ सोडत त्यांनी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
अशोक गहलोत सरकारमध्ये दोन वेळा राजेंद्र गुढा मंत्री राहिले आहेत. याआधी गुढा हे मुख्यमंत्री गहलोत यांचे निकटवर्तीय मानले जायचे. परंतु त्यानंतर सचिन पायलट यांच्या गटात गुढा गेले आणि त्यांनी उघडपणे गहलोत यांच्याविरोधात टीका सुरू केली.
काही दिवसांपूर्वी महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवरून सभागृहात गुढा यांनी काँग्रेस सरकारला घरचा आहेर दिला. त्यानंतर मंत्रिमंडळातून त्यांनी हकालपट्टी केली आणि पक्षातूनही बडतर्फ केले. या घटनेनंतर राजेंद्र गुढा हे एक लाल डायरी घेऊन विधानसभेत पोहचले होते.
राजेंद्र गुढा यांनी आणलेल्या त्या लाल डायरीत गहलोत सरकारचे अनेक काळे रहस्य लपवले आहेत. गुढा यांच्या आरोपाने विधानसभेत प्रचंड गोंधळ माजला होता. त्यानंतर राजस्थानच्या राजकारणातील लाल डायरी देशभरात चर्चेचा विषय बनली होती.
लाल डायरीची सुरुवात २०२० मध्ये झाली, जेव्हा सचिन पायलट यांनी बंडखोरी केली, त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय धर्मेंद्र राठोड यांच्या घरी तपास यंत्रणांनी धाड टाकली. तेव्हा लाल डायरी धर्मेंद्र राठोड यांच्याकडे होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांचा फोन आला ही डायरी कुठल्याही परिस्थितीत मिळवा. तेव्हा गुढा यांनी ही डायरी तपास यंत्रणेच्या न कळत बाहेर काढली होती असं म्हणतात.
लाल डायरी घेतल्यानंतर गुढा यांनी गहलोत यांना फोन केला, त्यांना डायरी मिळाल्याचे सांगितले. तेव्हा ती जाळून टाका असं मुख्यमंत्री म्हणाले होते, गुढा यांनी अनेकदा याचा उल्लेख केला परंतु त्यांना गांभीर्याने घेतले नाही. परंतु मंत्रिपद गेल्यानंतर अचानक गुढा यांनी ही लाल डायरी पुढे आणली.
या लाल डायरीत अनेक गैरव्यवहारांचा उल्लेख आहे. त्यात भाजपाचे आमदार पक्ष सोडून का पळाले. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतील खर्च याचे आकडेवारी आहे. त्याचसोबत आमदारांच्या घोडेबाजाराचाही हिशोबही या लाल डायरीत आहे असा दावा गुढा यांनी केला आहे. त्यामुळे गुढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने या डायरीतील रहस्य उलगडणार का हे पाहणे गरजेचे आहे.