पिंपरी-चिंचवड शहरातील ५०० काँग्रेस कार्यकर्ते होणार ‘भारत जोडो’त सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 11:58 AM2022-10-31T11:58:51+5:302022-10-31T11:59:20+5:30
शहरात निघणार तीन रॅली...
पिंपरी :काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो’ यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होत आहे. यात पिंपरी-चिंचवड शहरातील पाचशे युवा कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. नांदेड ते बुलडाणा या दरम्यान ते राहुल गांधी यांच्यासमवेत चालणार असल्याची माहिती शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्रात भारत जोडो पदयात्रा ३८२ किलोमीटरचा पल्ला गाठत पाच जिल्ह्यांमधून जाणार आहे. त्यामध्ये नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातील भारत जोडो यात्रेचा समारोप शेगाव येथे जाहीर सभेने होणार आहे. शहरातील काही काँग्रेस कार्यकर्ते संपूर्ण १६ दिवस राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत चालणार आहेत. यात्रेमध्ये फक्त काँग्रेस कार्यकर्तेच नव्हे, तर इतर कुठल्याही व्यक्तीला किंवा संघटनेला सहभागी होता येणार आहे.
रॅली काढून आवाहन
पिंपरी, चिंचवड, भोसरी तिन्ही विधानसभेत रॅली काढून नागरिकांना यात्रेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. यात्रेमध्ये फक्त काँग्रेस कार्यकर्तेच नव्हे, तर इतर कुठल्याही व्यक्तीला किंवा संघटनेला सहभागी होता येईल.
- कैलाश कदम, शहराध्यक्ष, काँग्रेस.
शहरातील सर्व क्षेत्रांतील संघटना, व्यापारी वर्ग, विद्यार्थी वर्ग, महिला वर्ग, समाजसेवी संघटना, वकील संघ, डॉक्टर संघ अशा विविध संघटनांच्या प्रतिनिधींना युवक काँग्रेसचे शिष्टमंडळ विविध संघटनांची भेट घेऊन त्यांनादेखील सहभागी होण्याचे आवाहन करणार आहे.
- गौरव चौधरी, प्रदेश सचिव, युवक काँग्रेस.
शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा भागातील भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होऊ इच्छित असणारे काँग्रेस कार्यकर्ते किंवा सर्वसामान्य जनतेसाठी संपर्काची सुविधा करण्यात आली आहे.
- सायली नढे, महिलाध्यक्ष, शहर काँग्रेस.