'आता आवाज आला ना तर तिकिटच कापतो', म्हणत अजित पवार संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 09:16 PM2019-03-05T21:16:00+5:302019-03-05T21:40:12+5:30
शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतेच आलेल्या डॉ अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभेचा उमेदवार म्हणून जाहीर करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अजूनही राष्ट्रवादीतर्फे कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र चर्चेमुळे मागील निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार विलास लांडे आणि त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत
पिंपरी चिंचवड : शिरूर लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी चर्चेत येण्यास सुरुवात झाली असून पक्षात नव्याने दाखल झालेल्या डॉ अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध सुरु झाल्याचे चित्र मंगळवारी बघायला मिळाले. यावेळी विलास लांडे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार संतापलेले बघायला मिळाले.
पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी भोसरीतील ''गावजत्रा मैदान'' येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ही घटना घडली. शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतेच आलेल्या डॉ अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभेचा उमेदवार म्हणून जाहीर करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अजूनही राष्ट्रवादीतर्फे कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र चर्चेमुळे मागील निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार विलास लांडे आणि त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात पक्षाच्या नेत्यांपर्यंत आवाज पोचावा या हेतूनेआणि लांडे यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून विलास लांडे पाहिजे, आमचा उमेदवार विलास लांडे अशा घोषणा कार्यकर्ते देत होते.
त्यांना अनेकदा शांत बसवण्याचा प्रयत्न करूनही घोषणाबाजी सुरु होती.अखेर वैतागलेल्या पवार यांचा पारा चढला. ते कार्यकर्त्यांना म्हणाले की, आता बेंबीच्या देठापासून घोषणा देत आहात मात्र २००९च्या लोकसभा निवडणुकीत कुठे होतात ? आता घोषणा दिल्यास तिकीटचं कापतो असं म्हणायलाही ते विसरले नाहीत.
यावेळी व्यासपीठावर दिलीप वळसे पाटील, डॉ. अमोल कोल्हे, देवदत्त निकम, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, अतुल बेनके, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, अपर्णा डोके, वैशाली घोडेकर, मोहिनी लांडे उपस्थित होते.