पिंपरी-चिंचवडमध्ये खासदार कुमार केतकर यांच्या भाषणावेळी गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 07:12 PM2022-11-19T19:12:08+5:302022-11-19T19:15:15+5:30
काही वेळासाठी केतकर यांना त्यांचे भाषण थांबवावे लागले..
पिंपरी : ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर हे पिंपरी-चिंचवड शहरातील पत्रकारांच्या कार्यक्रमात बोलत होते. ‘नफरत छोडो, भारत जोडो’ या पदयात्रेत राहुल गांधी यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, त्याची योग्य दखल काही माध्यमांकडून घेण्यात आली नाही, असे म्हणून केतकर यांनी पदयात्रेबाबत माहिती दिली. त्यावेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या काही जणांनी आक्षेप घेतला. त्यानंतर कार्यक्रमस्थळी गोंधळ झाला. त्यामुळे काही वेळासाठी केतकर यांना त्यांचे भाषण थांबवावे लागले.
पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकारांच्या शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमासाठी केतकर आले होते. त्यावेळी पत्रकारिता, पत्रकार आणि समस्या याबाबत केतकर बोलत होते. केतकर म्हणाले, आपल्या देशासह जगभरात पत्रकारांची गळचेपी होत आहे. पत्रकारितेचे स्वातंत्र्य असलेल्या देशात आणि बंधने असलेल्या चीनसारख्या देशातही असे प्रकार सातत्याने समोर येतात. राहुल गांधी यांच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, तरीही काही माध्यमांकडून त्याची योग्य दखल घेण्यात आलेली नाही. सोशल मीडियामुळे काही प्रमाणात आपल्याला या यात्रेबाबत माहिती झाले. राहुल गांधी या यात्रेत सर्वसामान्यांना भेटतात. त्यांच्या स्थानिक अडचणी, समस्या जाणून घेत आहेत, असे केतकर बोलत होते.
कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या काही जणांनी केतकर यांच्या या बोलण्यावर आक्षेप घेतला. राहुल गांधी आणि पदयात्रेबद्दल नव्हे तर पत्रकारिता आणि पत्रकारांच्या समस्या याबाबत बोला, असे ते म्हणाले. इतर उपस्थितांनी त्यांना विरोध केला. केतकर यांना बोलू द्या, असे इतरांनी सांगितले. यामुळे सभागृहात गोंधळ झाला. घोषणाबाजी सुरू झाली. काही जणांनी फोटो तसेच व्हिडिओ शुटिंग सुरू केले. त्यामुळे आयोजकांना पुढे यावे लागले. केतकर यांना त्यांचे मत मांडू द्या. त्यांना बोलण्यासाठीच बोलावले आहे. त्यांचे विचार पटत नसल्यास संबंधितांनी सभागृहातून बाहेर जावे, अशी सूचना करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी सभागृहातील गोंधळाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. गोंधळाची परिस्थिती निवळल्यानंतर केतकर यांनी पुन्हा भाषण सुरू केले.