राज्यात काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा; राहुल गांधींच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 07:19 PM2021-07-20T19:19:12+5:302021-07-20T19:20:56+5:30
राज्यात काँग्रेस पक्ष संघटन वाढीसाठी मोठी स्पेस आहे. त्यामुळे सखोल चर्चेनंतर निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितले.
नवी दिल्ली- आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस(Congress) स्वबळावरच निवडणुका लढवेल अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विशेष म्हणजे नाना पटोले(Nana Patole) आज दिल्लीत असून त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या भेटीनंतर ही घोषणा केली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीत राहुल यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्यास हिरवा कंदील दिल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो.
राज्यात काँग्रेस पक्ष संघटन वाढीसाठी मोठी स्पेस आहे. त्यामुळे सखोल चर्चेनंतर निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितले. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. यापुढील काळात राज्यात पक्षवाढीसाठी काय केलं पाहिजे यासाठी बैठकीत चर्चा झाली. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पुढे येईल त्यासाठी कामाला लागण्याचे आदेश मिळाल्याचं नाना पटोले म्हणाले.
त्याचसोबत विधानसभा, लोकसभा निवडणुकीबाबत तीन वर्षानंतर हायकमांड निर्णय घेईल. पण पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे हे नाना पटोलेंनी स्पष्ट केले. त्याचसोबत विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली नाही असंही नाना पटोले यांनी सांगितले. लवकरच राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून नागपूर, मुंबई आणि औरंगाबादमध्ये रॅली काढणार असल्याचं प्रभारी एच के पाटील म्हणाले.
शिवसेनेचा राहुल गांधींवर अप्रत्यक्ष निशाणा
सत्ता असेल किंवा नसेल, पक्षासाठी झोकून देऊन काम करणारे झोकदार लोकच पक्ष आणि संघटन टिकवीत असतात. अनेक राज्यांत काँग्रेसकडे असे लोक राहिलेले नाहीत. काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही, असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे, पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय, ते पाहावे लागेल असं शिवसेनेनं म्हटलं होतं.
काँग्रेसला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही
सामनाच्या अग्रलेखासंदर्भात नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला होता. संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली होती, त्यावरुन नानांना दिल्लीत पत्रकारांना प्रश्न विचारला. त्यावर, उत्तर देताना, मी सामना वाचत नाही, मी प्रतिक्रिया देणार नाही, असे नानांनी म्हटले. मात्र, त्याचबरोबर संजय राऊत यांना टोलाही लगावला. कोणी काय टीका करावी हा लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे, त्यावर प्रतिक्रिया द्यायची का हा आमचा अधिकार आहे. पण, वारंवार एखाद्या पक्षाकडून सोबत राहूनही बोललं जात असेल, तर त्याचा एकदा विचार आम्ही करू, असे पटोले यांनी म्हटलं होतं. तसेच काँग्रेसला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. सुईपासून रॉकेटपर्यंत या देशाची उभारणी काँग्रेसने केली आहे. गांधी परिवारावर टीका करणाऱ्याने एक लक्षात ठेवावं. सूर्यावर थुंकल्यानंतर ते आपल्याच अंगावर पडतं, असे म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊतांना नाव न घेता टोला लगावला होता.