राहुल गांधींनंतर कांग्रेसशी संबंधित अजून एका अकाऊंटवर ट्विटरची कारवाई, दिलं हे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 03:22 PM2021-08-09T15:22:05+5:302021-08-09T15:22:40+5:30
Congress & twitter News: ट्विटरने काँग्रेससी संबंधित अजून एका अकाऊंटवर कारवाई केली आहे. ट्विटरने काँग्रेसचा डिजिटल चॅनेल असलेल्या आयएनसी टीव्हीच्या अकाऊंटला तात्पुरत्या स्वरूपात लॉक केले आहे.
नवी दिल्ली - दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्विट केल्याने ट्विटरने नियमभंग झाल्याचा हवाला देत राहुल गांधींचे अकाऊंट तात्पुरते सस्पेंड केले होते. दरम्यान, आता ट्विटरनेकाँग्रेससी संबंधित अजून एका अकाऊंटवर कारवाई केली आहे. ट्विटरने काँग्रेसचा डिजिटल चॅनेल असलेल्या आयएनसी टीव्हीच्या अकाऊंटला तात्पुरत्या स्वरूपात लॉक केले आहे. ट्विटरने सांगितले की, आयएनसी टीव्हीने काही नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे त्यांचे अकाऊंट तात्पुरते लॉक करण्यात आले आहे.
तत्पूर्वी पक्षाचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट तात्पुरत्या स्वरूपात सस्पेंड करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला होता. त्यानंतर ट्विटरने काँग्रेसचा हा दावा फेटाळून लावला होता. तसेच हे अकाऊंट अद्याप सेवेत असल्याचेही सांगितले होते. त्यानंतर काँग्रेसने राहुल गांधी यांचे अकाऊंट तात्पुरत्या स्वरूपात लॉक करण्यात आले आहे.
दरम्यान, लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी शनिवार नंतर ट्विटरवर कुठलेही ट्विट केलेले नाही. राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट पूर्ववत व्हावे यासाठी सोमवारी युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीमध्ये ट्विटर कार्यालयासमोर आंदोलनही केले. तसेच राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट कुणाच्या सांगण्यावरू चुकीच्या पद्धतीने लॉक करण्यात आले, असा सवाल युवा काँग्रेसने विचारला आहे.
दरम्यान, गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्विट केला होता. त्यावर भाजपाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ट्विट हटवलं होतं. पण आता त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं सस्पेंड करण्यात आलं होतं.
एका वकिलाने पीडितेच्या कुटुंबाची ओळख जगजाहीर होत असल्यानं फोटोवर आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पीडितेच्या आईवडिलांचा फोटो शेअर केला आहे. यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख पटली आहे. त्यामुळे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार वकील विनीत जिंदल यांनी केली होती.
ट्विटरकडून आता राहुल गांधी यांचं थेट ट्विटर अकाऊंटच सस्पेंड करण्यात आल्यानंतर राहुल गांधी यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान, काही वेळानंतर राहुल गांधींच ट्विटर अकाऊंट पूर्ववत करण्यात आलं. पण ते नेमकं सस्पेंड का करण्यात आलं होतं याची चर्चा आता सुरू झाली आहे. काँग्रेसकडून ट्विटरला उत्तर पाठविण्यात आल्यानंतर राहुल गांधींचं ट्विटर अकाऊंट पूर्ववत करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.