निवडणुकीतील आश्वासने पाळण्याचा काँग्रेसचा इतिहास - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 05:25 AM2021-04-01T05:25:53+5:302021-04-01T05:27:07+5:30
Assam Assembly Elections 2021 : काँग्रेस पक्षाने नेहमीच आपली आश्वासने पाळली आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर दिलेली आश्वासने पाळल्याचा काँग्रेसचा इतिहास आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले.
गुवाहाटी : काँग्रेस पक्षाने नेहमीच आपली आश्वासने पाळली आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर दिलेली आश्वासने पाळल्याचा काँग्रेसचा इतिहास आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले. आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी ३९ मतदारसंघांत मतदान होणार आहे. ६ एप्रिल रोजी अंतिम टप्प्यात ४० ठिकाणी मतदान होणार आहे. (Assam Assembly Elections 2021 )
गुवाहाटीत कामाख्या मंदिरात पूजा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, आमचा पक्ष भाजपासारखा नाही. काँग्रेस दिलेली आश्वासने पाळतो. आम्ही लोकांना पाच प्रमुख मुद्यांवर शब्द दिला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आसाममध्ये लागू करणार नाही, पाच लाख तरुणांना रोजगार, सर्व घरांमध्ये दर महिन्याला २०० युनिट वीज नि:शुल्क उपलब्ध करणे, प्रत्येक गृहिणीला २,००० रुपये महिन्याला साहाय्यता, चहा मळ्यातील कामगारांची किमान रोजंदारी १९३ रुपयांवरून वाढवून ३६५ रुपये करणे, ही आश्वासने दिली आहेत.
राहुल गांधी म्हणाले की, पंजाब, छत्तीसगड, कर्नाटकात आमच्या पक्षाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर हे आश्वासन पूर्ण केले. छायगाव आणि बर्खेत्रीमध्ये निवडणूक रॅलीपूर्वी त्यांनी नीलांचलच्या शक्तिपीठ येथे पूजा केली. याठिकाणी ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. खराब हवामानामुळे ते सिलचर, हफलाँग येथील रॅली करू शकले नाहीत.