Bihar Election 2020: भाजपाकडूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला छेद देण्याचा प्रकार; शिवसेनेचा निशाणा
By प्रविण मरगळे | Published: October 23, 2020 10:00 AM2020-10-23T10:00:52+5:302020-10-23T10:03:20+5:30
Bihar Assembly Election 2020, Shiv Sena News: ज्यांनी भाजपाला मतदान केले नाही त्यांना कोरोनाची लस मोफत मिळणार नाही का? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.
मुंबई- बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने जाहीरनामा प्रकाशित केला आहे. सध्या या जाहिरनाम्यातील एका मुद्द्यावरुन भाजपाची अडचण होताना दिसत आहे. बिहारमध्ये सत्तेत आल्यास कोरोनाची लस मोफत देऊ असं आश्वासन भाजपाने दिलं आहे. मात्र यावरुन काँग्रेस-शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे.
याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात की, ज्यांनी भाजपाला मतदान केले नाही त्यांना कोरोनाची लस मोफत मिळणार नाही का? यापूर्वी जातीधर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात होता, आता कोरोनाच्या नावाखाली देशात फूट पाडण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. जिथं निवडणूक तिथेच लस देणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
तर भाजपाची विसंगती हा संशोधनाचा विषय आहे. तुम्ही मला व्होट द्या, आम्ही तुम्हाला लस देऊ, असा नवा नारा भाजपा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना घराघरात लस देणार असल्याचं सांगितलं पण भाजपाने बिहारच्या निवडणुकीत तेथील लोकांना मोफत लस देणार असल्याचं आश्वासन दिलं, त्यामुळे हा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला छेद देणारा आहे अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
विरोधकांचा भाजपावर हल्लाबोल
केंद्र सरकारने नुकतीच कोविड लसीबाबत धोरण आखले आहे. तुमच्या राज्यात विधानसभा निवडणुका कधी आहेत, त्यानुसार तुम्हाला कोरोनावरील लस कधी मिळेल, हे तुम्हाला समजेल, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केली आहे. तर आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केंद्राला लक्ष्य केले. बिगर भाजपशासित राज्यांचे काय? ज्या भारतीयांनी भाजपाला मतदान केले नाही, त्यांनी कोरोनावरील मोफत लस मिळणार नाही का? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे.
तुम मुझे व्होट दो मै तुम्हे व्हॅक्सिन दुंगा, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. भाजपा आपल्या तिजोरीतून लशीचे पैसे देणार आहे का? जर सरकारच्या तिजोरीतून लशीचे पैसे दिले जाणार असतील तर फक्त बिहारलाच मोफत लस का?असा सवाल त्यांनी केला.
बिहारला मोफत कोरोना लस, मग महाराष्ट्राचे काय?
सर्व राज्यांना मोफत लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना निवडणुका आहेत म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार, मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून त्यांना कोरोनावरील लस देणार नाही का? केंद्र सरकार गोरगरिबांकडून कोरोना लसीचे पैसे घेणार आहे का? असा प्रश्न राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विचारला आहे.
कोरोना महामारीने जनता त्रस्त आहे. अजून कोरोनाची लस उपलब्ध झालेली नाही त्यातच मतासाठी मोफत लसीचे गाजर दाखवणे हे भाजपाने ताळतंत्र सोडल्याचा प्रकार आहे. प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस मोफत मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे. मंगळवारी राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व भारतीयांना लस देण्यासाठी सरकारची तयारी आहे, असे सांगितले असताना बिहारच्या लोकांनाच मोफत लस देऊ असे आश्वासन जाहिरनाम्यात देण्याचा भाजपाचा हेतू काय? कोरोना लसीसाठी भारतीयांचा पैसा खर्च होणार आहे मग तो फक्त बिहारसाठीच का. इतर राज्यात लस देणार नाही? का त्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागतील. हा केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे असा आरोप त्यांनी केला आहे.