Bihar Election 2020: आज लोकसभा, राज्यसभा मिळूनही काँग्रेसचे १०० खासदार नाहीत- पंतप्रधान मोदी

By कुणाल गवाणकर | Published: November 3, 2020 01:06 PM2020-11-03T13:06:24+5:302020-11-03T13:07:44+5:30

Bihar Election 2020: लोकांना सदासर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला टोला

Bihar Election 2020 Congress does not have 100 MPs in Lok Sabha and Rajya Sabha says PM Narendra Modi | Bihar Election 2020: आज लोकसभा, राज्यसभा मिळूनही काँग्रेसचे १०० खासदार नाहीत- पंतप्रधान मोदी

Bihar Election 2020: आज लोकसभा, राज्यसभा मिळूनही काँग्रेसचे १०० खासदार नाहीत- पंतप्रधान मोदी

Next

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान सुरू आहे. आता निवडणुकीचा केवळ एकच टप्पा शिल्लक राहिल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी जोर लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन सभांना संबोधित करणार आहेत. यापैकी अररियामधल्या फारबिसगंजमध्ये भाषण करताना मोदींनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचा समाचार घेतला. लोकांना सदासर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही. काँग्रेसच्या सध्यस्थितीवरून हेच दिसतंय, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.




पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला. 'बिहारच्या जनतेनं डबल युवराजांना नाकारत पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे राज्यात एनडीएचं सरकार येणार हे निश्चित आहे,' असं मोदी म्हणाले. 'आज संपूर्ण जगाला बिहारनं संदेश दिला आहे. जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना बिहारी जनता उत्साहानं मतदानासाठी घराबाहेर पडली आहे. दुसऱ्या टप्प्यात सध्या बंपर मतदान सुरू आहे,' असं पंतप्रधान म्हणाले. कोरोना संकटात निवडणूक घेणाऱ्या निवडणूक आयोगाचेही मोदींनी आभार मानले.




'डबल युवराजां'वरून मोदींचा निशाणा
बिहारमध्ये एनडीएचंच सरकार येणार हा संदेश राज्यातल्या जनतेनं पहिल्याच टप्प्यातल्या मतदानातून दिला आहे. बिहारी जनतेनं डबल युवराज आणि जंगलराजला स्पष्टपणे नाकारलं आहे. एनडीएच्या विरोधात उभ्या ठाकलेल्यांनी सत्तेत असताना प्रचंड खाबुगिरी केली. आता पुन्हा ते बिहारकडे स्वार्थीपणे पाहत आहेत. पण राज्याचा विकास कोण करणार, याची बिहारी जनतेला अगदी व्यवस्थितपणे कल्पना आहे, अशा शब्दांत मोदींनी राजद-काँग्रेसवर हल्ला चढवला.

काँग्रेसवर मोदींचं टीकास्त्र
काँग्रेसनं देशाला खोटी स्वप्नं दाखवली. गरिबी हटवू, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, वन रँक वन पेंशन लागू करू, अशी आश्वासनं काँग्रेसनं दिली. मात्र त्यातलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. लोकांना सदासर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही. त्यामुळेच आज काँग्रेसची अवस्था वाईट आहे. लोकसभा, राज्यसभेतली सदस्यांची संख्या एकत्र करूनही त्यांचे १०० खासदार होत नाहीत. अनेक राज्यांत तर त्यांना भोपळाही फोडता आलेला नाही. उत्तर प्रदेश-बिहारमध्ये तर ते चौथ्या-पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळेच कोणाची तरी मदत घेऊन ते अस्तित्व टिकवू पाहत आहेत, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर घणाघात केला.

Web Title: Bihar Election 2020 Congress does not have 100 MPs in Lok Sabha and Rajya Sabha says PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.