“नाना पटोलेंना मुख्यमंत्री, राहुल गांधींना वाटतंय पंतप्रधान व्हावसं, पण...”; भाजपचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 06:38 PM2021-06-13T18:38:25+5:302021-06-13T18:42:44+5:30
स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा नुकतीच काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. यावरून आता भाजपने काँग्रेसला टोला लगावला आहे.
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकार आणि विरोधक अनेकविध मुद्द्यांवरून एकमेकांसमोर ठाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोना संकट अद्यापही कायम असताना दुसरीकडे निवडणुका आणि राजकारण यांवरून पक्षांमध्ये कलगीतुरा रंगताना दिसत आहे. यातच स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा नुकतीच काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. यावरून आता भाजपने काँग्रेसला टोला लगावला आहे. (bjp atul bhatkhalkar slams congress and nana patole over assembly election declaration)
नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे घोषित केले होते. त्यानंतर आता अन्य पक्षांकडूनही भूमिका मांडल्या जात असून, संमिश्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. यातच आता भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी नाना पटोले आणि राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.
“... तरच फायदा होईल, मोर्चा काढून निष्पन्न काय होणार”: अशोक चव्हाण
जनतेला असं अजिबातच वाटत नाही
नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय… राहुलजींनाही वाटतंय पंतप्रधान व्हावसं… जनतेला असं अजिबातच वाटत नाही. भविष्यात वाटण्याची शक्यताही नाही हाच दोघांचा प्रॉब्लेम आहे, या शब्दांत अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून चिमटा काढला आहे.
नाना पाटोलेंना मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय...
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 13, 2021
राहुलजींनाही वाटतंय पंतप्रधान व्हावसं...
जनतेला असं अजिबातच वाटत नाही, भविष्यात वाटण्याची शक्यताही नाही हाच दोघांचा प्रॉब्लेम आहे.@RahulGandhi@NANA_PATOLE
उगाच सत्तेवर येण्याची स्वप्न पाहू नका
यापूर्वी आणखी एक ट्विट करत अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. सत्तेवर आल्यावर काँग्रेस कलम ३७० पुन्हा लागू करेल असा दावा वरीष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यावर उरलेला काश्मीर पाकिस्तानला आणि लडाख चीनला देऊ शकतो, हे देशाच्या जनतेला पुरते कळून चुकले आहे म्हणून उगाच सत्तेवर येण्याची स्वप्न पाहू नका…, या शब्दांत भातखळकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता.
आता लहान समूह जगावर राज्य करू शकत नाहीत; चीनने दिला इशारा
दरम्यान, भाजप हा कायम आमचा विरोधी पक्ष आहे. शरद पवार भाजपाविरोधात मोट बांधत असतील, तर चांगली गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची आपल्याकडे मोठी यादी आहे, पण आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवले जाईल, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.