दिग्विजय सिंह म्हणाले - गोडसे देशातील पहिला दहशतवादी; भाजप खासदार प्रज्ञा सिंहांनी दिलं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 04:38 PM2021-01-13T16:38:28+5:302021-01-13T16:40:42+5:30
नाथूराम गोडसे (Nathuram Godse) भारतातील पहिला दहशतवादी असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. याला प्रत्युत्तर देत प्रज्ञा सिंहांनी दिग्विजय यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे.
भोपाळ : भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंहांवर (Digvijaya Singh) निशाणा साधला आहे. नाथूराम गोडसे (Nathuram Godse) भारतातील पहिला दहशतवादी असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. याला प्रत्युत्तर देत प्रज्ञा सिंहांनी दिग्विजय यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. काँग्रेस आणि त्यांचे नेते नेहमीच देशभक्तांना शिव्या देतात, असे प्रज्ञा सिंहांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर 'भगवा आतंकवाद' सारखा शब्दही काँग्रेसनेच आणला, आता यावरूनच त्यांचे विचार काय असतील, हे समजते, असेही प्रज्ञा सिंह म्हणाल्या.
काँग्रेसने केवळ देशभक्तांचा अपमान करणेच शिकले आहे -
प्रज्ञा सिंह ठाकून या भोपाळमधून भाजपच्या खासदार आहेत. दिग्विजय सिंह यांच्या नाथूराम गोडसेसंदर्भातील वक्तव्यासंदर्भात त्यांना विचारले असता, आपल्या अंदाजातच त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. प्रज्ञासिंग ठाकूर म्हणाल्या, ‘काँग्रेसने केवळ देशभक्तांचा अपमान करणेच शिकले आहे. त्यांच्या नेत्यांनी ‘भगवा आतंकवाद’ सारख्या शब्दांचा वापर केला आहे. याहून अधिकि शरमेची गोष्ट काय असू शकते.’
Congress has always abused the patriots. He has said 'Bhagwa aatank' (Saffron terror), what can be worse than this: BJP MP Pragya Singh Thakur on being asked 'Congress leader Digvijaya Singh called Godse the first terrorist' pic.twitter.com/mB0LlB3qL8
— ANI (@ANI) January 13, 2021
प्रज्ञा सिंह म्हणाल्या होत्या नथुराम देशभक्त -
तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी गोडसे देशभक्त असल्याचे म्हटले होते. यावरून प्रज्ञा सिंह या वादाच्या भोवऱ्यातही अडकल्या होत्या. याच मुद्द्यावर देशाचे राजकारणही तापले होते. यानंतर भाजपला स्पष्टिकरणही द्यावे लागले होते. मात्र, असे असतानाही प्रज्ञा सिंह या भोपाळमधून मोठ्या फरकाने विजयी झाल्या होत्या.
प्रशासनाने बंद केली गोडसे ज्ञानशाळा -
ग्वाल्हेर जिल्हा प्रशासनाने दखल घेतल्यानंतर हिंदू महासभेने नाथूराम गोडसेंची ज्ञानशाळा मंगळवारी बंद केली. 10 जानेवारीला हिंदू महासभेने दौलतगंज येथील आपल्या कार्यालयात ही ज्ञानशाळा सुरू केली होती. तसेच यावेळी गोडसेची पुजाही करण्यात आली होती. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. तसेच शिवराज सरकारलाही घेरले जात होते. यानंतर प्रशासनाने महासभेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ही ज्ञानशाळा बंद करण्यात आली. तसेच संबंधित भागात कलम 144 लावण्यात आले.