Corona Vaccination: “दिव्याखाली अंधार, समजलं तर बरंय”; स्मृति इराणींची राहुल गांधींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 09:54 PM2021-06-22T21:54:00+5:302021-06-22T21:55:46+5:30
Corona Vaccination: राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेवरून केलेल्या टीकेला केंद्रीयमंत्री स्मृति इराणी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने कोरोनाचा फैलाव, लसीकरण, इंधनदरवाढ यांसारख्या अनेकविध मुद्द्यांवरून टीका करताना पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेवरून केलेल्या टीकेला केंद्रीयमंत्री स्मृति इराणी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दिव्याखाली अंधार, समजलं तर बरं आहे, असा टोला स्मृति इराणी यांनी राहुल गांधींना नाव न घेता लगावला आहे. (bjp smriti irani replies rahul gandhi over corona vaccination criticism)
केंद्रातील मोदी सरकारच्या लसीकरण मोहिमेवर राहुल गांधींनी श्वेतपत्रिका काढत टीका केली. यावर आता केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी पलटवार केला आहे. ग्यानी बाबा पंतप्रधान नरेंद्र मोदींना ज्ञान देत असताना त्यांनी काही गोष्टींवर आत्मपरीक्षण करण्याचीही गरज आहे, या शब्दांत स्मृति इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
लसीकरण घोटाळ्याबाबत हायकोर्टाची तीव्र नाराजी; पालिका, ठाकरे सरकावर ताशेरे
सर्वाधिक मृत्यूदर असणारी काँग्रेसशासित राज्य
कोरोनाची दुसरी लाट कुठून सुरू झाली? काँग्रेस शासित राज्यांमध्ये. कोणत्या राज्यामध्ये देशात सर्वाधित करोना रुग्ण आणि कोरोना बळी आहेत? काँग्रेसशासित राज्यांमध्ये. सर्वाधिक मृत्यूदर असणारी राज्य – काँग्रेसशासित राज्य. काँग्रेसशासित राज्यांमध्येच सर्वाधिक प्रमाणात लसीकरणाविरोधी आवाज उठत असून, त्यामुळे लस घेण्यात टाळाटाळ केली जात आहे, अशी टीका इराणी यांनी केली आहे.
• Who demanded decentralization & then did a u-turn?- Congress
— Smriti Z Irani (@smritiirani) June 22, 2021
• Which states did the worst in terms of vaccination yesterday even as the country created a world record? - Congress ruled states
कहावत है ‘दिया तले अंधेरा’ - समझ जाये तो बेहतर है।
लसीकरणाच्या विकेंद्रीकरणाची मागणी कुणी केली?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये काँग्रेस शासित राज्यांमध्येच मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्हिटी रेट आढळून आला. लसीकरणाच्या विकेंद्रीकरणाची मागणी कुणी केली? आणि त्यानंतर पुन्हा त्यावरून घुमजाव कुणी केले? काँग्रेसने, अशी टीकाही स्मृति इराणी यांनी केली आहे. तसेच “कहावत है, दिया तले अंधेरा. समझ जाये, तो बेहतर है”, असा खोचक टोलाही इराणी यांनी लगावला आहे.
फेसबुकवर योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा अखिलेश यादव अधिक पॉप्युलर!; हे आकडे काय दर्शवतात?
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना विनाकारण आपला जीव गमवावा लागला आहे. आपण त्यांना ऑक्सिजन सिलेंडर्स पुरवू शकलो नाही. पंतप्रधानांचे अश्रू सदस्य गमावलेल्या कुटुंबाचे अश्रू पुसू शकत नाही. त्यांचे अश्रू त्यांना वाचवू शकत नाही, ऑक्सिजन वाचवू शकतो. पण त्यांनी हे गांभीर्याने घेतले नाही कारण त्यांचे सगळे लक्ष बंगालच्या निवडणुकीवर होते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.