सट्टा बाजारात मोदींची हवा; पंतप्रधानपद कायम राहण्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 11:08 AM2019-03-22T11:08:54+5:302019-03-22T11:11:39+5:30
सत्ता बाजारातील भाजपाचं वर्चस्व कायम राहण्याचा अंदाज
भोपाळ: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं भाजपाकडून जाहीर करण्यात आलं. उत्तर प्रदेशातून मोदी आणि गुजरातमधून पक्षाध्यक्ष अमित शहा निवडणूक लढवणार असल्यानं भाजपाच्या आशा उंचावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सट्टा बाजारात भाजपाला झुकतं माप मिळतं आहे. आगामी निवडणूक निकालानंतरही सत्ता बाजारात भाजपाचं वर्चस्व कायम राहील, असा अंदाज मध्य प्रदेशच्या सट्टा बाजारानं व्यक्त केला आहे. यंदा भाजपाला 246 ते 249 जागा मिळतील, अशी शक्यता सट्टा बाजारातील बुकींनी वर्तवली आहे. तर काँग्रेसला 76 ते 78 जागा मिळण्याचा अंदाज आहे. याआधी राजस्थानातील सट्टा बाजारानं भाजपाला 250 हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता.
मध्य प्रदेशच्या सट्टा बाजारानं विधानसभा निवडणुकीवेळी व्यक्त केलेला अंदाज जवळपास खरा ठरला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपाला 102 आणि काँग्रेसला 116 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसला 114, तर भाजपाला 109 जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपाला राज्यातील सत्ता गमवावी लागली. मात्र लोकसभा निवडणुकीतील गणितं वेगळी आहेत. विधानसभेचं मैदान मारणाऱ्या काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत फारसं यश मिळणार नाही, असा अंदाज आहे. राज्यात लोकसभेचे 29 मतदारसंघ आहेत. यातील 21 जागांवर भाजपाला विजय मिळेल, असा अंदाज आहे.
काँग्रेस, भाजपानं अद्याप सर्व जागांवरील उमेदवारदेखील जाहीर केलेले नाहीत. मात्र सट्टा बाजारानं भाजपाच्या बाजूनं कौल दिला आहे. मात्र सट्टा बाजारानं भाजपाच्या बाजूनं कौल दिला आहे. भाजपाला काँग्रेसपेक्षा तिप्पट जागा मिळतील, असा अंदाज बुकींनी वर्तवला आहे. 'एखाद्या व्यक्तीनं भाजपावर सट्टा लावला आणि भाजपाला 246 पेक्षा कमी जागा मिळाल्या, तर त्याला दुप्पट रक्कम मिळेल. मात्र भाजपाला 246 पेक्षा अधिक जागा मिळाल्यास त्या व्यक्तीला एकही पैसा मिळणार नाही,' असं एका बुकीनं सांगितलं.