पंजाबात ‘कॅप्टन’ची विकेट; अमरिंदर सिंग यांचा CM पदाचा राजीनामा, निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 07:20 AM2021-09-19T07:20:17+5:302021-09-19T07:21:47+5:30
नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाबचे मुख्यमंत्री अजिबात करू नका, त्यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत, पंतप्रधान इम्रान खान व तेथील लष्करप्रमुख बाजवा हे सिद्धू यांचे दोस्त आहेत, असा आरोप करत या सर्व बाबी आपण काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कानावर घातल्या असल्याचे अमरिंदर यांनी सांगितले.
चंदीगड/नवी दिल्ली : मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस प्रदेशामध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील छत्तीसचा आकडा, त्यातून दोघांचे झालेले गट, वाढलेली गटबाजी आणि त्यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता व असंतोष यांचा स्फोट होत आहे, हे लक्षात येताच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याचे आदेश शनिवारी दिले. त्यामुळे सिंग यांनी पद सोडले खरे, तर तसे करताना थेट बंडाचीच भाषा केली.
मुख्यमंत्रिपदासाठी नवज्योतसिंग सिद्धू आणि सुनील जाखड या दोघांची नावे सर्वात पुढए आहेत. जाखड हे पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष असून, चार वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. माजी लोकसभाध्यक्ष स्व. बलराम जाखड यांचे ते चिरंजीव आहेत. अमरिंदर सिंग राजीनामा देणार हे स्पष्ट होताच जाखड यांनी घाईघाईने ट्विट करून पक्षाने घेतलेल्या निर्णयाची तरफदारी केली आणि राहुल गांधी यांचेही कौतुक केले.
... आणि निर्णय झाला
पुढील वर्षी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असताना माजलेली बजबजपुरी काँग्रेसला परवडणे शक्यच नव्हते. हे असेच सुरू राहिले, तर पंजाबमध्ये तुल्यबळ विरोधक नसूनही आपला पराभव होईल, या निष्कर्षाप्रत काँग्रेस श्रेष्ठी आले होते. हे दोन्ही नेते मात्र एकमेकांवर कुरघोडी करू पाहत होते. त्यातही अमरिंदर सिंग आता आपल्यालाच आव्हान देऊ लागले आहेत, असे पक्षश्रेष्ठींना जाणवले. त्यामुळे सोनिया गांधी यांनी शनिवारी त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. सिंग यांना केवळ ५० आमदारांचे समर्थन आहे आणि सिंग यांनी अनेकांना दुखावले आहे, त्यांच्याविषयी लोकांतही नाराजी आहे, हे लक्षात आल्यानंतरच त्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय झाला.
राजीनामा द्या, माझा नाईलाज आहे
पण तुम्हाला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावाच लागेल, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी अमरिंदर सिंग यांना आदेश देण्यात आला. त्यावेळीही आपल्यामागे इतके आमदार आहेत, आता नेता बदलल्यास विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होईल, सिद्धू यांना मुख्यमंत्री करणे हे तर काँग्रेस व राज्यासाठी मोठे संकटच ठरेल, असे सिंग यांनी सोनिया गांधी यांना सांगितले. त्यावर माझा नाईलाज आहे, तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल, असे त्या म्हणाल्या.
नवज्योत सिद्धू पाकचे हस्तक : अमरिंदर सिंग
नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाबचे मुख्यमंत्री अजिबात करू नका, त्यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत, पंतप्रधान इम्रान खान व तेथील लष्करप्रमुख बाजवा हे सिद्धू यांचे दोस्त आहेत, असा आरोप करत या सर्व बाबी आपण काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कानावर घातल्या असल्याचे अमरिंदर यांनी सांगितले. तसेच सिद्धू यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही. सिद्धू यांना मुख्यमंत्री केल्यास पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशाराही त्यांनी दिला.
समझोत्याचे प्रयत्न असफल
- अमरिंदर सिंग व सिद्धू यांच्यात गेल्या काही दिवसांपासून अजिबात विस्तवही जात नव्हता. त्यांच्यात समझोता घडवून आणण्याचे प्रयत्न अपयशी ठरत होते.
- त्यामुळे राहुल व प्रियांका गांधी यांनीही दोघांना
समजावण्याचा प्रयत्न केला.
- पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनीही दोघांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु काही झाले तरी दोघांपैकी एक जण बंडखोरी करणारच, असे दिसू लागले होते.
नवा कर्णधार कोण? पेच कायम
अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला असला तरी आता ते पद कोणाकडे द्यायचे हा पेच काँग्रेस श्रेष्ठींपुढे कायम आहे. सिद्धू यांना ते पद मिळाले, तर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कॅप्टन काही आमदारांसह काँग्रेसमधून बाहेर पडतील आणि सरकारही पाडतील. त्याचा निवडणुकीत मोठा फटका बसू शकेल. दुसरीकडे जाखड यांना पद दिले तर सिद्धूही गप्प बसणार नाहीत. अशा स्थितीत काँग्रेस कोणाच्या गळय़ात मुख्यमंत्रिपदाची माळ घालते, हे पाहावे लागेल.
... तर राहुल गांधी यांना पर्याय शोधावा लागेल
इडुक्की : काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज आहे. राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, अशी आमची इच्छा आहे. मात्र, ते तयार नसतील तर पर्याय शाेधावा लागेल, असे परखड मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी व्यक्त केले आहे.