संसदेत ट्रॅक्टर घेऊन गेल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात खटला दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 10:54 IST2021-07-27T10:54:21+5:302021-07-27T10:54:44+5:30
Congress Tractor Rally:पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे संसद परिसरात कलम 144 लागू आहे.

संसदेत ट्रॅक्टर घेऊन गेल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात खटला दाखल
नवी दिल्ली:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल संसदेत ट्रॅक्टर रॅली काढली होती. त्यावरुन आता दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. संसद मार्ग पोलिस स्टेशनमध्ये राहुल गांधींसहकाँग्रेस नेत्यांवर भा.दं.वि. कलम 188 आणि महामारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी ट्रॅक्टर घेऊन संसदेपर्यंत कसे आले, याचाही तपास दिल्ली पोलिस करत आहे.
पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे संसद परिसरात कलम 144 लागू आहे. अशा परिस्थितीत ट्रॅक्टर परिसरात कसा आला, हा प्रश्न विचारत भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय. दरम्यान, पोलिसांच्या सूत्रांनी सांगिल्यानुसार, आतापर्यंतच्या तपासात समोर आलयं की, काँग्रेसने रविवारी रात्रीच एका कंटेनरमधून ट्रॅक्टर लुटियन झोन परिसरात आणला होता. सध्या दिल्ली पोलिसांनी हा ट्रॅक्टर जप्त केला असून, अधिक तपास सुरू आहे.
आंदोलनाची परवानगी नव्हती
दिल्ली पोलिसांनी सांगितल्यानुसार, काँग्रेसकडून या ट्रॅक्टर रॅलीसाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच, या ट्रॅक्टरच्या पुढे-मागे नंबर प्लेटही नव्हती. सध्या या ट्रॅक्टरच्या मालकाचा शोध सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितल्यानुसार, नवी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर चालवण्यास बंदी आहे. त्यामुळे काँग्रेसने जाहिररित्या मोटार अॅक्टचे उल्लंघन केलंय.
विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा
संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलै रोजी सुरू झाले आहे. पहिल्याच दिवसापासून विरोधक महागाई, कृषी कायदे, पेगासस गुप्तहेरी आणि इतर मुद्यांवर सरकारवर निशाणा साधत आहेत. या गोंधळामुळे एक दिवसही संसदेचे कामकाज पूर्ण होऊ शकले नाही.