काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 05:39 PM2024-10-08T17:39:23+5:302024-10-08T17:40:00+5:30
Kumari Shailja Haryana Election Result 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जबर झटका बसला. एक्झिट पोलमुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, पण प्रत्यक्ष निकाल वेगळेच लागले. यात एक फॅक्टर कुमारी शैलजांच्या नाराजीचाही मानला जात आहे.
Haryana Elections Resutl Kumari Shailja: लोकसभा निवडणुकीनंतर जोमाने कामाला लागलेल्या काँग्रेसलाहरयाणात मोठा झटका बसला. भाजपाने तिसऱ्यांदा काँग्रेसलाहरयाणातील सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवले. भाजपाच्या रणनीतीबरोबरच या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाला पक्षातील गटबाजीही कारणीभूत ठरली. यात कुमारी शैलजा यांच्या नाराजीचा फटका काँग्रेसला बसल्याचे निकालानंतर बोलले जात आहे. हरयाणातील निकालावर कुमारी शैलजा यांनीही भाष्य केले आहे.
हरयाणा विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजीचा मोठा फटका काँग्रेसला बसला. भुपेंद्र सिंह हुड्डा गटाचं वर्चस्व या निवडणुकीत पाहायला मिळालं. त्यामुळे पक्षातील दलित चेहरा असलेल्या कुमारी शैलजा नाराज होत्या. त्याचबरोबर रणदीप सुरजेवालाही निवडणुकीच्या प्रचारापासून अंतर ठेवून राहिले. 'शैलजा यांचा अपमान झाला' ही गोष्ट विरोधकांकडूनही जोर देऊन मांडली गेली. त्याचा परिणाम निकालावर झाल्याचे राजकीय विश्लेषकही सांगत आहेत.
काँग्रेसचा पराभव; कुमारी शैलजांनी काय केलं भाष्य?
हरयाणातील काँग्रेसच्या पराभवाबद्दल बोलताना कुमारी शैलजा म्हणाल्या, "खूपच निराशा झाली आहे. तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना बघा. खूप काळापासून ते काम करत होते, अशा वेळी जेव्हा कोणीही उभं राहताना दिसत नव्हतं."
"राहुल गांधींचा संदेश घेऊन आम्ही गावागावांत गेलो. कडाक्याच्या थंडी, प्रखर उन्हात... आमचे कार्यकर्ते गेले. कार्यकर्त्यांनी मेहनत केली, पण असे निकाल आले... त्यांच्या मेहनतीवर, त्यांच्या कष्टावर पाणी फेरले गेले. ही गोष्ट पक्षाला बघावी लागले. पक्ष आत्मपरिक्षण करेल", असे भाष्य त्यांनी केले.
तुमच्याबद्दल काही गोष्टी झाल्या, नाराजीबद्दल... कुमारी शैलजा म्हणाल्या, "वेळेवर मौनही बाळगावं लागतं."
#WATCH | #HaryanaElections| Delhi: Congress MP Kumari Selja says, "The results are extremely disappointing. Our workers worked for so long, we went to villages with the message of Rahul Gandhi but after the results, it looks like all their efforts have gone to waste. The party… pic.twitter.com/uN9fREi3Em
— ANI (@ANI) October 8, 2024
भाजपा ठरला सर्वात मोठा पक्ष
हरयाणा विधानसभा निवडणुकीत ४९ जागांसह भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसला ३६ जागा मिळाल्या असून, दोन जागा आयएनएलडी, तर तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. अपक्षांमध्ये देशातील सर्वात श्रीमंत महिला असलेल्या सावित्री जिंदाल यांचा समावेश आहे.