मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेसची मोठी जबाबदारी; अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 08:48 PM2021-05-11T20:48:34+5:302021-05-11T20:51:51+5:30
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी या समितीची घोषणा केली आहे.
मुंबई - देशभरात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकींची समीक्षा करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन जाहीर केली आहे. मंगळवारी संध्याकाळी याबाबत दिल्लीहून घोषणा करण्यात आली.(Congress Ashok Chavan Selected as Chairman of constitution of group to evaluate the results of the recently concluded assembly elections)
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी या समितीची घोषणा केली आहे. या समितीत वरिष्ठ नेते सलमान खुर्शिद, माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी, व्हिन्सेंट पाला, खा. ज्योती मणी हे चार सदस्य असतील. देशात नुकत्याच पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ व पुदुच्चेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ही समिती या पाचही राज्यांच्या निकालाचे विवेचन करून पुढील १५ दिवसांत आपला अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सादर करेल.
या जबाबदारीबद्दल अशोक चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत. या निवडणुकीच्या निकालाबाबत संबंधित राज्यांमधील काँग्रेसचे उमेदवार, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून आपण अहवाल सादर करू, असे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे.
INC COMMUNIQUE
— INC Sandesh (@INCSandesh) May 11, 2021
Important Notification regarding constitution of group, as mentioned below, to evaluate the results of the recently concluded assembly elections pic.twitter.com/vci6OzpwjO
पक्षाला सुधारणांची गरज, निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट
नुकतेच पाच विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. तसंच यासोबत पोटनिवडणुकांचेही निकाल जाहीर झाले. यामध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, खराब कामगिरीनंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी CWC च्या बैठकीत कामगिरी चांगली करण्याचं सदस्यांना आवाहन केलं होतं. तसंच निवडणुकांच्या निकालांवरून हे स्पष्ट होतंय की काँग्रेसला सुधारणांची गरज आहे, असंही त्या म्हणाल्या होत्या. आसाम आणि केरळमध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत असलेल्या काँग्रेसला पुन्हा पराभवाचा फटका बसला आहे.
"आपल्याला या गंभीर परिस्थितीची दखल घेण्याची गरज आहे. आपण खुप निराश आहोत हे म्हणणंदेखील कमी ठरेल," असं सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांनी निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी एक टीम तयार करण्याची इच्छा व्यक्त केली. तसंच त्यांच्याकडून त्वरित रिपोर्ट घेण्यात यावा, असंही त्यांनी नमूद केलं. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या पार पडलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. त्यानंतर आज या समितीची घोषणा करण्यात आली आहे.
"केरळ आणि आसाममधील विद्यमान सरकारला सत्तेतून काढून टाकण्यासाठी आपण का अयशस्वी झालो आणि बंगालमध्ये आपले खाते का उघडले नाही, हे आम्हाला समजून घेतले पाहिजे," असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. २ जानेवारीला आपली बैठक झाली तेव्हा आम्ही काँग्रेसच्या अध्यक्षांची निवडणूक जूनच्या मध्यापर्यंत पूर्ण होईल, असा निर्णय घेतला होता. निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी निवडणुकीचे वेळापत्रक निश्चित केलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.