काँग्रेस राजकारणाची दिशा बदलणार; भाजपाला टक्कर देण्यासाठी सॉफ्ट हिंदुत्व कार्ड खेळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 06:40 PM2020-08-20T18:40:42+5:302020-08-20T18:50:54+5:30
कमलनाथ सुरुवातीपासूनच मध्य प्रदेशात सॉफ्ट हिंदुत्वाच्या मार्गावर आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आणि सत्तेत आल्यानंतर त्यांनी मतांचे ध्रुवीकरण करणारे कोणतेही विधान करू नये अशा स्पष्ट सूचना पक्षातील नेत्यांना दिल्या होत्या.
भोपाळ - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आजकाल हिंदुत्वाच्या भोवती राजकीय मैदान बनवण्याची तयारी करण्यात व्यस्त आहेत. सरकार कोसळल्यानंतर कमलनाथ राज्यात सॉफ्ट हिंदुत्वाच्या दिशेने जाताना दिसत आहेत. ज्यामुळे भाजपा कट्टर हिंदुत्वाचा मुकाबला करू शकतील. कमलनाथ राजकीयदृष्ट्या ही खेळी खेळत आहेत. कारण यात काही नुकसान नाही पण राजकीय फायदा दिसून येत आहे. अशा परिस्थितीत हनुमानापासून भगवान श्रीकृष्ण, श्री राम यांचाही पुरेपूर वापर होत आहे.
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचं क्रेडिट वॉर सुरु झालं आहे. मध्य प्रदेश कॉंग्रेसने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७६व्या जयंतीनिमित्त राज्यात एक जाहिरात दिली आहे, या जाहिरातीत दावा केला आहे की, राजीव गांधींनी रामराज्याची संकल्पना मांडली होती. एवढेच नव्हे तर अयोध्येत राम मंदिराचा पायाही राजीव गांधींनी घातला होता आणि त्यांनी रामजन्मभूमीचे कुलूपही उघडले होते. राजीव गांधी हे रामराज्याच्या गतिमान प्रवासाचे कुशल सारथी आहेत असं जाहिरातीत म्हटलं आहे.
राजीव गांधी यांनी १९८५ मध्ये दूरदर्शनवर रामायण मालिका सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी रामजन्मभूमीचे कुलूप उघडले आणि भाविकांना रामलल्लाचे दर्शन घडवले. इतकेच नव्हे तर १९८९ मध्ये त्यांनी रामजन्मभूमीची पायाभरणी करण्याची परवानगीही दिली होती. कमलनाथ म्हणाले होते की, जर कोणी राम मंदिराचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते चुकीचे आहे. एवढेच नव्हे तर ५ ऑगस्टला अयोध्यातील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी कमलनाथ यांनी त्यांच्या निवासस्थानी राम दरबार आयोजित केला होता तर काँग्रेस खासदारांनी कार्यालयात दिवे पेटवले होते.
वास्तविक, कमलनाथ सुरुवातीपासूनच मध्य प्रदेशात सॉफ्ट हिंदुत्वाच्या मार्गावर आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आणि सत्तेत आल्यानंतर त्यांनी मतांचे ध्रुवीकरण करणारे कोणतेही विधान करू नये अशा स्पष्ट सूचना पक्षातील नेत्यांना दिल्या होत्या. यासोबतच सत्तेत असताना त्यांनी हिंदू धार्मिक स्थळांबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामध्ये श्रीलंकेतील सीता मंदिर बांधण्यासाठी निधीची व्यवस्था करण्यापासून ओरछा येथील रामराजाच्या मंदिराच्या नूतनीकरणाच्या प्रक्रियेपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.
सॉफ्ट हिंदुत्वाच्या दिशेने काँग्रेस?
मध्य प्रदेशात २७ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. कमलनाथ यांच्या 'सॉफ्ट हिंदुत्वा'ला यामाध्यमातून पाहिले जात आहे. मध्य प्रदेशचे ज्येष्ठ पत्रकार योगेश जोशी यांचे म्हणणे आहे की, सॉफ्ट हिंदुत्व कार्ड खेळून मध्य प्रदेशात कॉंग्रेसचे कोणतेही राजकीय नुकसान झाले नाही कारण मुस्लिम मतदारांसमोर दुसरा कोणताही राजकीय पर्याय नाही. २०१८ च्या निवडणुकांमध्ये कमलनाथ या सूत्रानुसार भाजपला हरवण्यात यशस्वी ठरले आहेत. यामुळेच आता पोटनिवडणुकीतही त्यांना हेच धोरण अवलंबण्याची इच्छा आहे.
मध्य प्रदेशात भाजपाने आपल्या पंधरा वर्षांच्या सरकारच्या कारकीर्दीत कॉंग्रेसच्या पारंपारिक व्होट बँकला धक्का दिला आहे. गेल्या निवडणुकीत कमलनाथ यांच्या सॉफ्ट हिंदुत्वामुळे मतांचे जातीय आधारे ध्रुवीकरण होऊ शकले नाही. इंदूर आणि भोपाळसारख्या जातीयदृष्ट्या संवेदनशील शहरांमध्येही कॉंग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. सिंहस्थ सारख्या धार्मिक कार्यक्रमांचे भव्य स्वरूपही भाजपाच्या मदतीला आलं नाही. दलितांना भाजपाच्या बाजूने आणण्यासाठी आयोजित सामंजस्य स्नानाचा परिणामही शिवराजांच्या बाजूने दिसला नाही.
२०१८ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळू शकले नसले तरी कॉंग्रेसला ११४ जागा जिंकता आल्या आणि भाजपाला १०८ जागा मिळाल्या. मार्च २०२० मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी समर्थक आमदारांसह कॉंग्रेसविरुध्द बंड करून भाजपामध्ये प्रवेश केला, त्यानंतर कमलनाथ यांचे १५ महिन्यांचे सरकार पडले आणि शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपा पुन्हा एकदा सत्तेत आली. आता २७ विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून अशा परिस्थितीत काँग्रेस हिंदू कार्डचा वापर करुन पाहणार आहे.