Rahul Gandhi in Loksabha: लिहून घ्या, शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही; राहुल गांधी लोकसभेत गरजले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 06:14 PM2021-02-11T18:14:26+5:302021-02-11T18:15:50+5:30
Rahul Gandhi in Loksabha: राहुल गांधी यांनी लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार टीका केलीय.
"शेतकरी हा देशाच्या पाठिचा कणा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा कणाच मोडण्याचा घाट घातला आहे. माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही", असं ठाम विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत केले आहे. लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बोलत असताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. (Rahul Gandhi Attacks On Narendra Modi Over Farm Laws)
मोदी सरकारने लागू केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांमधील त्रृटी यावेळी राहुल गांधी यांनी सांगितल्या. "पहिल्या कायद्यात कडधान्य, फळे, भाज्या कुठेही आणि कितीही खरेदी करण्याची मुभा आहे. यामुळे जर कोणत्याही नियंत्रणाशिवाय खरेदी केली गेली तर मंडीमध्ये काय येईल? मंड्या संपविण्याचे कारस्थान हे कारस्थान आहे", असं राहुल गांधी म्हणाले. तर दुसऱ्या कायद्यात मोठ्या व्यावसायिकांना हेच अन्नधान्य त्यांना हवे तेवढे साठविण्याची मुभा देण्यात आलीय. यामुळे दुसरा कायदा हा अत्यावश्यक वस्तू कायदा संपविणारा असून साठेबजी वाढेल, असं राहुल म्हणाले. तिसऱ्या कायद्याबद्दल बोलत असताना राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या पाठिचा कणाच मोडून टाकल्याचं विधान केलं. "तिसऱ्या कायद्यामध्ये जेव्हा शेतकरी या उद्योजकांकडे शेतमालाला जास्त किंमत मागतील तेव्हा त्यांना न्यायालयात जाण्याची परवानगीच नसेल. यामुळे शेतकरी रस्त्यावर येईल", असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
देश फक्त 'दम दो, हमारे दो'साठी चालवलं जातंय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघं देशातील दोन बड्या उद्योगपतींसाठी देश चालवत असल्याचा घणाघात राहुल गांधी यांनी केला. "देश फक्त हम दो आणि हमारे दो यांच्यासाठीच चालवलं जात आहे. यात हम दो आणि हमारे दोन कोण आहेत हे आता संपूर्ण देशाला माहित झालं आहे. हे फक्त शेतकऱ्यांचं आंदोलन आहे असं जर तुम्ही समजत असाल तर ही मोठी चूक आहे. हे शेतकऱ्यांचं नाही, तर संपूर्ण देशाचं आंदोलन आहे. मी आजही लिहून देतो की कृषी कायदे रद्द केल्याशिवाय शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही. मोदींना कृषी कायदे रद्द करावेच लागतील", असं राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितलं.
लोकसभेत राहुल गांधींसह काँग्रेस खासदारांचं दोन मिनिटांचं मौन
दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आंदोलकांमध्ये आतापर्यंत अनेकांचा जीव गेला याबाबत मोदी सरकार भावनाशून्य असल्याचं म्हणत राहुल गांधी यांनी केंद्रावर जोरदार टीका केली. आंदोलनात जीव गमवावा लागलेल्या शेतकऱ्यांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत श्रद्धांजली देखील अर्पण केली नाही हे दुर्दैव असल्याचं म्हणत राहुल गांधी यांनी आपल्या भाषणानंतर काँग्रेसच्या खासदारांना दोन मिनिटांचं मौन धारण करुन आंदोलनात जीव गमवावा लागलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचं आवाहन केलं.