आसाममध्ये राहुल गांधी म्हणाले, "हम दो हमारे दो ऐकून घ्या, काहीही झालं तरी CAA ..."
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 02:28 PM2021-02-14T14:28:08+5:302021-02-14T14:30:41+5:30
Rahul Gandhi in Assam : अवैध इमिग्रेशनचा मुद्दा असला तरी तो सोडवण्याची ताकद आसामच्या लोकांमध्ये, राहुल गांधींचं वक्तव्य
येत्या काही दिवसांमध्ये आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडू शकतात. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. भाजपानं एकीकडे जोर लावण्यास सुरूवात केली आहे, तर दुसरीकडे आता काँग्रेसही रिंगणात उतरली आहे. राहुल गांधी यांनि शिवसागर जिल्ह्यातील शिवनगर बोर्डिंग फिल्डमधून पक्षाच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात केली. त्यांनी आपल्या संबोधनादरम्यान आसामचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत काँग्रेस नेते तरूण गोगोई यांच्या आठवणींना उजाळा देत कौतुक केलं.
"अवैध इमिग्रेशनचा मुद्दा आहे. परंतु आसामच्या लोकांमध्ये तो सोडवण्याची क्षमता आहे. आसामला नुकसान झालं तर देशाचंही नुकसान होईल. काहीही झालं तर CAA येथे कधीही लागू होणार नाही. हम दो हमारे दो असलेल्या सरकारनं ऐकून घ्यावी या ठिकाणी कधीही CAA लागू होणार नाही," असं राहुल गांधी म्हणाले.
"हम दो हमारे दो आणि बाकी सर्वांनी मरून जावं. हम दो हमारे दो... आसाम चालवत आहेत. आसाममध्ये जा, आग लावा, आणखी जे काही आसाममध्ये आहे ते लूटा. जे या ठिकाणी द्वेष पसरवण्याचं काम करतील त्यांना इकडची जनता आणि काँग्रेस मिळून योग्य धडा शिकवू," असंही ते म्हणाले.
"काँग्रेस छोटे व्यापारी, कष्टकरी आणि गरीब लोकांचा पक्ष आहे, आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा एक गोष्ट होईल. जो द्वेष पसरवला जात आहे तो कमी होईल. आम्ही सर्व धर्म आणि जातीच्या लोकांचं संरक्षण करू. २००४ ते २०१४ या काळात भारताचा झपाट्यानं आर्थिक विकास झाला. कोट्यवधी लोकांना आम्ही गरीबीतून बाहेर काढलं. आम्ही तरूणांमधील भीती घालवून टाकू. आसाममधील बेरोजगारी आम्ही संपवू," असंही ते म्हणाले.
#WATCH | ".....Hum ne yeh gamchha pehna hai.. ispe likha hai CAA.. ispe humne cross laga rakha hai, matlab chahe kuchh bhi ho jaye.. CAA nahi hoga.. 'hum do, hamare do' achhi tarah sun lo, (CAA) nahi hoga, kabhi nahi hoga," says Congress leader Rahul Gandhi in Sivasagar, Assam pic.twitter.com/ZYk7xAUdYx
— ANI (@ANI) February 14, 2021
रिमोटनं आसाम चालणार नाही
"रिमोट हा टीव्ही चालवू शकतो परंतु आसाम चालवू शकत नाही. तुमचा मुख्यमंत्री हा आसामचाच असायला हवा. तुमच्या मुख्यमंत्र्यांना आसामचीच कामं करायला हवी. सध्याचे मुख्यमंत्री दिल्ली आणि गुजरातच्या इशारावर कामं करतात. म्हणूनच आपल्याला त्यांना हटवायचं आहे," असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
आसाम वाचवा अभियान
आसाममध्ये काँग्रेसनं भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आसाम वाचवा हे आंदोलन सुरू केलं आहे. या अंतर्गत काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि राज्यातील स्वयंसेवक गैर सरकारी संघटना, नागरिकांकडे जातील आणि त्यांच्याशी चर्चा करतील. यादरम्यान, ते विधासभा निवडणुकांपूर्वी पक्षाच्या जाहीरनाम्याबाबत लोकांकडून सूचनाही घेतील. यावर्षी एप्रिल-मे महिन्यादरम्यान या ठिकाणी निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे.