पुडुचेरीत राहुल गांधींनी केलं राजीव गांधींच्या मारेकऱ्यांवर वक्तव्य; म्हणाले, "मी त्यांना माफ..."
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 01:20 PM2021-02-18T13:20:05+5:302021-02-18T13:22:08+5:30
Rahul Gandhi on Rajiv Gandhi : "माझे वडील अजूनही माझ्यात आहेत. ते माझ्याद्वारे बोलत आहेत," असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची १९९१ मध्ये हत्या करण्यात आली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुडुचेरी येथे संवाद साधताना यावर भाष्य केलं. आपले वडिल राजीव गांधी यांच्या हत्येमुळे आपल्याला खुप दु:ख झालं होतं. परंतु त्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांप्रती आपल्या मनात कोणताही राग अथवा द्वेष नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आपण त्यांना माफ केल्याचंही ते म्हणाले. राहुल गांधी यांनी पुडुचेरी येथी एका महाविद्यालयात विद्यार्थीनींशी संवाद साधत होते.
चर्चेदरम्यान एका विद्यार्थीनीनं राहुल गांधी यांना त्यांच्या वडिलांच्या हत्येबद्दल प्रश्न विचारला. तसंच याबद्दल त्यांच्या काय भावना आहेत? असा सवालही केला. "हिंसाचार तुमच्याकडून काहीही हिसकावून घेऊ शकत नाही. मला कोणाच्याही बाबतीत राग नाही. मी माझ्या वडिलांना गमावलं आणि ती माझ्यासाठी कठिण वेळ होती. आपलं हृदय वेगळं करण्यासारखी ही गोष्ट होती," असं राहुल गांधी उत्तर देताना म्हणाले.
"मला खुप दु:ख झालं होतं. परंतु मला राग नाही. माझ्या मनात कोणताही द्वेष नाही. मी त्यांना माफ केलं आहे," असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. "हिंसाचारातून काहीही हिसकावून घेतलं जाऊ शकत नाही. माझे वडील अजूनही माझ्यात आहेत. माझे वडील माझ्याद्वारे बोलत आहेत," असंही त्यांनी नमूद केलं.
सर नको राहुल म्हणा
यावेळी त्यांनी विद्यार्थीनींशी संवाद साधताना आपल्याला सर नाही, तर राहुल म्हणून संबोधण्याचं आवाहन केलं. यावेळी एका विद्यार्थीनीनं राहुल गांधी यांना त्यांचे मित्र आणि गर्लफ्रेन्डबद्दल प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना त्यांनी आपले अनेक मित्र असल्याचं सांगितलं. परंतु त्यांनी गर्लफ्रेन्डबाबत प्रश्नाचं उत्तर देताना यावर पुन्हा कधीतरी यावर बोलू असं म्हटलं.
यावेळी एका विद्यार्थीनीनं त्यांच्याकडे आपल्याला इंजिनिअरिंग शिक्षण घेता येत नसल्याची खंत व्यक्त केली. यावरून राहुल गांधी यांनी तिला आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा सल्ला देत मदतीचं आश्वासन दिलं. तसंच तिला वाटत असलेल तर तिच्या आई-वडिलांशीही चर्चा करू असंही ते म्हणाले. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांच्या सुटकेचं काही लोकांनी समर्थन केलं आहे. परंतु तामिळनाडू काँग्रेसनं मात्र याचा विरोध केला आहे.