"अदानींची संपत्ती १२ लाख कोटींनी वाढली, तुमची किती वाढली?... शून्य..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 06:27 PM2021-03-13T18:27:58+5:302021-03-13T18:29:49+5:30
Gautam Adani : भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड मोठी वाढ; जगातल्या बड्या उद्योगपतींना टाकलं मागे, अहवालातून खुलासा
गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांची संपत्ती वेगानं वाढत आहे. अदानी यांच्या संपत्ती वाढीचा वेग जेफ बेझोस आणि अॅलन मस्कपेक्षा अधिक आहे. या वर्षात अदानी यांची संपत्ती सर्वाधिक वेगानं वाढत आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार या वर्षी गौतम अदानी यांची संपत्ती २०२१ या वर्षात १६.२ अब्ज डॉलर्सवरून वाढून जवळपास ५० अब्ज डॉलर्स इतकी वाढली आहे. यावरून आता काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी एका अहवालाचा हवाला देत एक ट्वीट केलं आहे. यामध्ये गौतम अदानी यांची संपत्ती जेफ बझोस आणि अॅलन मस्क यांच्यापेक्षाही वेगानं वाढल्याचं म्हटलं आहे. यावरून राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी यांसदर्भात एक ट्वीट करत नागरीकांना त्यांची संपत्ती किती वाढली आहे, असा सवाल केला आहे.
"तुमची संपत्ती २०२० मध्ये किती वाढली? शून्य. तुम्ही जण्यासाठी संघर्ष करत आहात. परंतु त्यांनी १२ लाख कोटी रूपये कमवून आपली संपत्ती ५० टक्क्यांनी वाढवली आहे. तुम्ही मला सांगू शकता असं का?," अशा आशयाचं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे.
मुकेश अंबानींनादेखील टाकलं मागे
गौतम अदानी यांनी संपत्ती वाढीच्या शर्यतीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनादेखील मागे टाकलं आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख असलेल्या मुकेश अंबानींच्या संपत्तीत चालू वर्षात ८१० कोटी रुपयांनी वाढली आहे. मात्र एकूण संपत्तीचा विचार केल्यास अदानी अंबानी यांच्यापेक्षा बरेच मागे आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार अंबानी यांची नेटवर्थ (निव्वळ कमाई) ८,४८० कोटी डॉलर इतकी आहे. तर अदानी यांच्या संपत्तीचं मूल्य ५ हजार कोटी डॉलर आहे.
उद्योगाचा वेगानं विस्तार
न्याका ऍडव्हायजरी सर्व्हिसेसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील चंदिरमानी यांनी केलेल्या विश्लेषणानुसार, अदानी अतिशय वेगानं त्यांच्या उद्योगाचा विस्तार करत आहेत. बंदरं, विमानतळं, कोळसा खाणी या क्षेत्रांमध्ये अदानी यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. आता ते डेटा सेंटर उद्योगातही उतरत आहेत. अदानी एंटरप्रायझेसनं गेल्याच महिन्यात भारतात १ गिगाव्हॅट क्षमतेचं डेटा सेंटर उभारण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.